माझ्या बदनामीमागे सरकारमधील मंत्री - एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

भुसावळ - 'अंजली दमानिया हे केवळ एक प्यादे आहे. मला बदनाम करण्यामागचा "मास्टर माइंड' राज्य सरकारमधील एक मंत्री आहे. त्याला उघडे पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तो कितीही मोठा असला, तरी त्याच्या विरुद्ध कायदेशीर लढाई लढेन,'' असा गौप्यस्फोट राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

भुसावळ - 'अंजली दमानिया हे केवळ एक प्यादे आहे. मला बदनाम करण्यामागचा "मास्टर माइंड' राज्य सरकारमधील एक मंत्री आहे. त्याला उघडे पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तो कितीही मोठा असला, तरी त्याच्या विरुद्ध कायदेशीर लढाई लढेन,'' असा गौप्यस्फोट राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

भुसावळ येथे भाजपचे प्रा. सुनील नेवे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खडसे म्हणाले, 'माझ्या संपत्तीची चौकशी करण्यासंदर्भात दमानिया यांनी सादर केलेले धनादेश बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, न्यायालयासही दमानिया व "टीम'ने आम्ही खडसे यांच्या विरोधात सादर केलेले पुरावे सत्य असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले होते.''

खडसे पुढे म्हणाले, 'याबाबत तत्कालीन पोलीस अधीक्षक सुपेकर यांनीही धनादेश बनावट असल्याचे तपासाअंती सांगितले होते. तरीही गुन्हा दाखल होत नव्हता. याबाबतची कागदपत्रे देऊनही पोलीस टाळाटाळ करत असल्याचे सध्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही सांगितले. मात्र, तेच कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे जाणवले. शेवटी मुक्ताईनगर न्यायालयात हे प्रकरण दाखल केले. न्यायालयाच्या आदेशानुसार अंजली दमानिया, गजानन मालपुरे आदींसह सहा जणांविरुद्ध "एफआयआर' दाखल झाला आहे.''

लाभार्थी मंत्र्याचे नाव बाहेर येईलच
राजकारणात 40 वर्षांत माझ्यावर एकही आरोप झाला नाही, असे सांगून खडसे म्हणाले, 'दोन वर्षांत मला बदनाम करण्याचे मोठे षड्‌यंत्र रचले गेले. समाजात मला बदनाम करून मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याइतपत परिस्थिती निर्माण करण्यात आली. समाजात मी भ्रष्टाचारी, नालायक, अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मला खूप मनस्ताप झाला. या प्रकारात अंजली दमानिया हे केवळ प्यादे आहे. यामागे राज्यातील मंत्री आहे. त्यानुसारच निश्‍चितच मी मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यावर कोणाला तरी लाभ होणार असेल, अशा लाभार्थ्यांचा मी शोध घेणार आहे. ज्यांनी मला त्रास दिला त्याचे नाव बाहेर येईलच. ते नाव मी आत्ताच सांगू शकत नाही.''

आरोप झाल्यापासून लाचलुचपत विभागाने माझी तीन वेळा, तर कुटुंबाची तीन वेळा चौकशी केली. त्यात काहीही चुकीचे आढळून आलेले नाही. असे असूनही केवळ मला बदनाम करण्यासाठी हे षड्‌यंत्र रचले गेले.
- एकनाथ खडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते

Web Title: eknath khadse talking politics