खडसेंचे निर्दोषत्व, मंत्रिमंडळात पुनरागमन सभेच्या केंद्रस्थानी

खडसेंचे निर्दोषत्व, मंत्रिमंडळात पुनरागमन सभेच्या केंद्रस्थानी

जळगाव - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात राज्यात युती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव जिल्ह्यात प्रथमच दौरा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असलेल्या या दौऱ्यात शिवसेनेचे पदाधिकारी या व्यासपीठावर उपस्थित राहणार काय? या प्रश्‍नासोबतच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे आरोपातून निर्दोषत्व आणि मंत्रिमंडळात पुनरागमन, याबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याचीच संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे.

गेल्या साडेचार वर्षांत राज्यात युतीची सत्ता असली तरी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकावर जोरदार आरोप केले आहेत. शिवसेना नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत युती होणार नाही, असे भाकीत राजकीय धुरिणांकडून वर्तविले जात होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ठिकाणीही आपल्या राजकीय चाणाक्षपणाची चुणूक दाखवीत शिवसेनेबरोबर ‘युती’ घडवून आणली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचा ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज (ता. २१) पहिलाच दौरा होत आहे. धरणगाव व भुसावळ येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. 

खडसेंबाबतच्या भूमिकेकडे लक्ष
राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांना गैरव्यवहाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे भाजपतील त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली आहे. त्यातून ते निर्दोष सुटल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे खडसे  यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे, अशी त्यांच्या समर्थकांचीही मागणी आहे. मात्र, याबाबत शासनाने त्यांच्या निर्दोषत्वाची अधिकृत घोषणा केलेली नाही. स्वत: खडसे यांनी याबाबतची शासनाने घोषणा करावी, अशी जाहीरपणे मागणी केली आहे. मात्र, अद्यापही शासनाकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही, तसेच त्यांचा मंत्रिमंडळात पुन्हा प्रवेश होणार, याबाबतही मध्यंतरी चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्याबाबतही आता पक्षाच्या पातळीवर सर्वच पदाधिकारी मौन बाळगत आहेत. 

मुख्यमंत्र्यांची सकारात्मकता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्या काही दिवसांपासून एकनाथराव खडसे यांच्याबाबत सकारात्मकता दिसून आलेली आहे. खडसे मंत्री असताना त्यांनी काही निर्णय घेतले होते; परंतु त्यांनी राजीनामा दिल्यानंतर या कामांच्या फाइल ‘ठप्प’ पडल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात खडसे यांच्या समवेत मंत्रालयात सचिव तसेच सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली होती. त्यात हे सर्व प्रश्‍न निकाली काढण्यात आले. त्यामुळे खडसे यांनीही समाधान व्यक्त केले होते.

पुढची भूमिका काय?
मुख्यमंत्र्यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या रावेर लोकसभा मतदार संघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करावे, अशी अपेक्षा एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली होती. त्यालाही प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी भुसावळ येथे जाहीर सभा घेण्याचे मान्य केले. त्यानुसार ते उद्या (ता. २१) दौऱ्यावर येत आहेत. खडसेंच्या आग्रहाखातर होत असलेल्या दौऱ्यात मुख्यमंत्री कोणत्या घोषणा करणार, याची प्रतीक्षा असली तरी कार्यकर्त्यांना खडसेंचे गैरव्यवहारातील निर्दोषत्व आणि मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत काय भूमिका जाहीर करणार? याचीच खऱ्या अर्थाने उत्सुकता आहेत. 

जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प
जिल्ह्यात सुरू झालेले प्रकल्प अजूनही थांबलेले आहेत. देशात सर्वत्र महामार्गाचे काम जोरात सुरू असताना तरसोद ते फागणे रस्त्याचे काम निधीअभावी थांबले आहे. याशिवाय जिल्ह्यात महत्त्वाकांक्षी असलेले पाडळसरे, शेळगाव बॅरेज, बोदवड उपसा सिंचन या प्रकल्पांचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. तर मेगा रिचार्ज प्रकल्पाचा सर्व्हे झाला; परंतु पुढे काय, याबाबत प्रश्‍नचिन्हच आहे. जिल्ह्यात कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. कापसाला भाव मिळावा, यासाठी जामनेरला टेक्‍स्टाईल पार्कची घोषणा झाली. एवढेच काय ते बस्स पुढे आणखी कोणतीच प्रक्रिया झालेली नाही. केळी संशोधन केंद्रांचे भिजत घोंगडेच आहे. याबाबत मुख्यमंत्री ठोस भूमिका जाहीर करणार काय? याचीच जिल्हावासीयांना उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com