निवडणुकीच्या कामाचे निवृत्त कर्मचाऱ्यांना आदेश 

अंबादास देवरे
गुरुवार, 17 मे 2018

सटाणा : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती व बागलाण तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सटाणा बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवृत्त शिक्षक व प्राध्यापकांना निवडणुकीच्या कामासाठी आदेश दिल्याने लालफितीचा भोंगळ कारभार कसा असतो. याची प्रचिती काल बुधवार (ता.१६) रोजी येथे आली.

सटाणा : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती व बागलाण तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सटाणा बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवृत्त शिक्षक व प्राध्यापकांना निवडणुकीच्या कामासाठी आदेश दिल्याने लालफितीचा भोंगळ कारभार कसा असतो. याची प्रचिती काल बुधवार (ता.१६) रोजी येथे आली.

जिल्हा परिषदेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा आता सरसकट निवडणूक कामाच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर बागलाण तालुक्याची निवडणूक असताना देवळा तालुक्यातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

कोणत्याही निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहून काम करावे यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी व संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.

मात्र सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरु असलेल्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व चांदवडचे उपविभागीय अधिकारी संदीप भंडारे यांनी फेब्रुवारी २०१७ मधील जिल्हा परिषद निवडणुकीतील निवडणूक कामासाठी नियुक्त असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या माहितीचा डाटा जसाच्या तसा सटाणा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी वापरला आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षात निवृत्त झालेल्या सात ते आठ कर्मचाऱ्यांना व येत्या ३१ मे रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही त्यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या अवघ्या दोन दिवसांसाठी निवडणूक कामी नियुक्ती केल्याने प्रशासनाच्या लालफितीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शिक्षक वर्गात आज दिवसभर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. सटाणा बाजार समितीसाठी येथील गुरुप्रसाद मंगल कार्यालयात शिक्षकांसाठी पहिल्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेनऊपासून शिक्षक उपस्थित असताना निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भंडारे यांचे दुपारी थेट साडेबारा वाजता प्रशिक्षण वर्गात आगमन झाले.

दरम्यान, आपल्या पथकातील गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काम केलेले सहकारी निवृत्त झालेले असतानाही त्यांची नियुक्ती पुन्हा या निवडणुकांसाठी केल्याने मोठा अन्याय झाल्याची भावना पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली. 

काही कर्मचारी आठ दिवसात निवृत्त होत असल्याने आम्हाला हे काम नको म्हणून त्यांनी लेखी विनंती केली, मात्र नामपूर व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही. निवडणूक यंत्रणेच्या या सावळ्या गोंधळाची प्रशिक्षणस्थळी एकच चर्चा सुरु होती.

Web Title: Election works Order for Retired Employees