भाजपचे चाणक्य म्हणाले, 'या' तारखेला होतील महाराष्ट्रात निवडणुका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

नाशिक -  सत्ता तर दूरच, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे राज्यात ५० आमदारही निवडून येणार नाहीत. माझे आकडे कधी चुकत नाहीत. आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागते, निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांना भाजप प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपच सत्तेत येणार, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (ता. १४) येथे केला. 

विधानसभा निवडणूकपूर्व वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी नाशिकमध्ये आले असताना श्री. महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे नवनिर्वाचित  प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेत येईल, असा दावा केला होता. त्यांचा हा दावा श्री. महाजन यांनी खोडून काढला. भाजप सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामांचे गुणगान करतानाच त्यांनी आगामी निवडणुकांसाठी उपस्थित लोकप्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. अपघातविरहित सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनापासून यशस्वितेपर्यंतच्या कामगिरीचा प्रवासही त्यांनी ऐकविला. जिल्ह्यात येत्या काळात अनेक महत्त्वाच्या कामांना सुरवात होणार असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.

निवडणूक तारखा
श्री. महाजन यांनी उत्साहात भाषण करताना, १५ सप्टेंबरला आचारसंहिता लागून १० ते १५ ऑक्‍टोबरच्या दरम्यान विधानसभेच्या निवडणुका होतील, असे जाहीर केले. पुढील वर्षातही पुन्हा सत्तेत बसण्याची संधी मिळेल. जेमतेम दोन महिनेच शिल्लक राहिल्याने कामाला लागा, असे सांगून बैठकीसाठी उपस्थित लोकप्रतिनिधींना निवडणुकांसाठी शुभेच्छा दिल्या. नियोजन समितीची अखेरची बैठक असल्याने इच्छुक आणि आमदारांचेही पालकमंत्र्यांच्या मागे-पुढे फिरणे या वेळी लक्षवेधी ठरले. एका बाजूला आमदार सूचना मांडत असताना दुसरीकडे व्यासपीठावर जाऊन अनेक जण आपल्या कामांचे पत्र देऊन, त्यावर स्वाक्षऱ्या घेत होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections in Maharashtra will be on this date