वीज खंडनाने गावे तहानलेली!

वीज खंडनाने गावे तहानलेली!

जळगाव - वीजबिलाच्या थकबाकीपोटी जिल्ह्यातील अनेक पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेकडो गावे तहानलेली असून, यासंदर्भात माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या नेतृत्वात काल जिल्ह्यातील आमदारांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मात्र, थकबाकी मोठी असल्याने अडचणी असल्याचे कारण समोर आल्यानंतर त्यावरील तोडग्यासाठी आता पालकमंत्र्यांसह आमदार आज (ता. २७) मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.  जळगाव मंडळातील अनेक गावे तसेच पाणीपुरवठा योजनांकडे वीजबिलाची कोट्यवधींची थकबाकी आहे. त्यामुळे या योजनांसह प्रत्येक तालुक्‍यातील काही ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा ‘महावितरण’ने खंडित केला आहे. 

सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या थकबाकीत जळगाव जिल्ह्याचा आकडा मोठा आहे. जिल्ह्यातील २२५० ग्राहकांकडे जवळपास १६९ कोटी ९१ लाख २५ हजारांची थकबाकी आहे. सार्वजनिक योजनांमधील दहापैकी जिल्ह्यातील सहा योजनांकडे दहा कोटींची थकबाकी असल्याने या योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास दीडशे गावे आणि व्यक्तिगत योजनांसाठी शंभरावर ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे गेल्या दीड-दोन महिन्यांपासून ही गावे तहानलेली आहेत. 

टॅंकरही सुरू होईना
यंदा अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके दुष्काळी जाहीर झाली असून, भीषण टंचाईचे सावट या तालुक्‍यांवर आहे. असे असताना पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यात १७६ टॅंकरची आवश्‍यकता आहे; परंतु टॅंकरही सुरू केले जात नाहीत. यासाठी खडसेंसह आमदारांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना वीजपुरवठा सुरू करण्यासाठी साकडे घातले. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार हरिभाऊ जावळे, संजय सावकारे हेदेखील उपस्थित होते.

‘महावितरण’ला हवे लेखी
पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला; परंतु ‘महावितरण’ला वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात लेखी आदेश हवेत, असे सांगण्यात आले. ऊर्जामंत्र्यांनी थकबाकी मोठी असल्याने निर्णय घेण्यास अडचण आहे, हे कारण पुढे केले. 

मुख्यमंत्र्यांना भेटणार
त्यातून तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्वांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविले; परंतु आज नियोजित भेट होऊ शकली नाही. आता पालकमंत्री, खडसे व आमदार आदी उद्या (ता. २७) मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात भेटणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीतून मार्ग निघू शकेल, अशी शक्‍यता आहे.

जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित केला आहे. तो सुरू करण्याबाबत ऊर्जामंत्र्यांसह पालकमंत्र्यांशी चर्चा केली. यासंदर्भात आम्ही मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. गावे तहानलेली आहेत, लवकरच याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही करणार आहोत. 
- एकनाथराव खडसे, माजी मंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com