Dhule News : ‘एलईडी’ पथदीपांमुळे वीजबिल कमी; अद्यापही तीन हजारांची गरज | Electricity bill reduced due to LED street light Seventeen thousand LED lights Still need three thousand Saving of sixteen and a half lakhs Dhule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity Bill News

Dhule News : ‘एलईडी’ पथदीपांमुळे वीजबिल कमी; अद्यापही तीन हजारांची गरज

Dhule News : महापालिकेच्या माध्यमातून हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण धुळे शहरात एलईडी पथदीप बसविल्यामुळे वीजबिलातही पूर्वीच्या तुलनेत सुमारे १६ लाख ५० हजार रुपये दरमहा बचत होत आहे.

त्यामुळे एलईडी पथदीप बसविल्याचा उद्देश साध्य होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हद्दवाढ क्षेत्रासह शहरात १७ हजारांवर पथदीप बसविण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, अद्यापही तक्रारींचा पाढा कायम आहे.

महापालिकेने धुळे शहरात एलईडी पथदीप बसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर डीपीआरनुसार १४ हजार ५०० एलईडी बसविण्याचे उद्दिष्ट होते. या कामासाठी १३ कोटी ६५ लाख रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला होता. (Electricity bill reduced due to LED street light Seventeen thousand LED lights Still need three thousand Saving of sixteen and a half lakhs Dhule News)

निविदा प्रक्रियेअंती वल्लभ इलेक्ट्रिकल्स या कंपनीला हे काम मिळाले. कंपनीमार्फत जून २०२१ पासून शहरात पथदीप बसविण्याचे काम सुरू झाले.

एलईडी पथदीप बसविल्यानंतर शहरात झगमगाट तर होईलच पण प्रामुख्याने वीजबचत होऊन महापालिकेच्या वीजबिलातही मोठी बचत होईल या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले. एलईडी पथदीप बसविण्याचे काम सुरू झाले खरे पण सुरवातीपासूनच नगरसेवक, नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्या, त्या अद्याप संपलेल्या नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘डीपीआर’पेक्षा जास्त काम

एलईडी पथदीपांच्या डीपीआरनुसार १४ हजार ५०० एलईडी बसविण्याचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात आत्तापर्यंत १७ हजारांवर एलईडी बसविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहाय्यक अभियंता एन. के. बागूल यांनी दिली.

डीपीआरपेक्षा जास्त पथदीप लागले आहेत. डीपीआरमध्ये हद्दवाढ क्षेत्राचा समावेश नव्हता. मात्र या भागातील नगरसेवकांच्या रेट्यामुळे या भागातही एलईडी बसविण्याचे काम सुरू झाले.

हद्दवाढ क्षेत्रातील केवळ वलवाडी भागातच साडेपाच हजार एलईडी आहेत. दरम्यान, १७ हजार एईडी बसविले गेले असले तरी अद्यापही सुमारे तीन हजार एलईडींची गरज असल्याचे अभियंता बागूल म्हणाले.

साडेसोळा लाख बचत

एलईडी पथदीप बसविल्यानंतर या पथदीपांचे मीटरदेखील बदलण्यात आले. त्यामुळे अपेक्षेनुसार दरमहा वीजबचतीसह महापालिकेच्या वीजबिलात मोठी बचत होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही बचत सुरू झाली आहे.

दरमहा तब्बल १६ लाख ५० हजार रुपये वीजबिल पूर्वीच्या तुलनेने कमी येत असल्याचे अभियंता बागूल यांनी सांगितले. यापूर्वी हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण धुळे शहरातील पथदीपांचे वीजबिल ५५ ते ६० लाख रुपये दरमहा येत होते. ते आता तब्बल साडेसोळा लाखांनी कमी झाले आहे.

एलईडी’ पथदीपांची स्थिती अशी

डीपीआरनुसार - १४,५००

डीपीआरनुसार खर्च - .१३ कोटी ६५ लाख

प्रत्यक्षात लागले - १७ हजार ३२५

अद्यापही गरज - सुमारे तीन हजार

आत्तापर्यंत खर्च - साडेदहा कोटी रुपये

ठेकेदाराला अदा - साडेपाच कोटी रुपये