राज्यभरात मध्य रेल्वेची 2800 कोटींची वीजबचत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

नाशिक - वीज कंपनीऐवजी रत्नागिरी पॉवर कंपनीकडून वीज खरेदीमुळे महाराष्ट्रात मध्य रेल्वेला अडीच वर्षांत 2 हजार 800 कोटींचा लाभ झाला असून, एप्रिलपासून आणखी पाच वर्षांसाठी रत्नागिरी पॉवरसोबतच्या कराराला मध्य रेल्वेने मुदतवाढ दिली आहे. राज्यात 50 वीज उपकेंद्रांवरून वीज खरेदीत प्रतियुनिट सरासरी 3.50 पैसे बचत झाल्यामुळेच सुमारे 2 हजार 800 कोटींची वीज खरेदीत बचत झाल्याचा रेल्वेच्या सूत्रांनी म्हटले आहे.

रेल्वेसाठी लागणारी वीज खरेदीच्या व्यवहारात पारदर्शकता आणताना, रेल्वेने स्वस्तातील वीज खरेदीला प्राधान्य दिले. परिणामी, वीज वितरण कंपनीऐवजी खुल्या बाजारातून वीज खरेदीचे करार केले आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत 2025 पर्यंत रेल्वेने देशात 41 हजार कोटींच्या वीजबिलातील बचतीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. रेल्वेच्या वाढत्या वीज खर्चात कपात करण्यासाठी सौरऊर्जेसह खुल्या बाजारातील वीजबचत असे नानाविध पर्याय स्वीकारण्याचे धोरण अडीच वर्षांपासून स्वीकारले आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने रेल्वेला विशेष दर्जा दिला. त्याला केंद्रीय विद्युत नियामक आयोगाने मान्यता दिल्याने रेल्वेला वीज खरेदी करारात व्यवहारिकता आणण्यास मदत झाली आहे.

Web Title: electricity saving 2800 crore central railway