लाटेवरचे आमदार धास्तावले

लाटेवरचे आमदार धास्तावले

नाशिक - आगामी लोकसभा निवडणुकीची ‘सेमी फायनल’ म्हणून मानल्या गेलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सूपडा साफ झाला. त्यामुळे केंद्रातील सत्तेत मोदी लाटेवर विराजमान झालेले भाजपचे आमदार धास्तावले आहेत.

मनसेचे इंजीन धावण्यास हातभार लावणाऱ्या नाशिककरांनी परिवर्तनशीलतेचे दर्शन घडवत नाशिकमधील तिन्ही विधानसभेच्या जागांवर आणि महापालिकेत कमळ फुलविले. मात्र आजच्या भाजपच्या झालेल्या धुळधाणीचे तत्काळ दृश्‍यपरिणाम नाशिकमध्ये दिसून आले. नाशिककरांप्रमाणे ग्रामीण-आदिवासी भागात सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी बळावत असताना सी.एम. करंडकाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या भाजपचे शहरातील तिन्ही आमदार निकालांमुळे धास्तावले आहेत. स्पर्धांमध्ये व्यस्त असल्याचे दाखविताना दुसरीकडे प्रत्येक राज्यातील मतमोजणीची सूक्ष्म माहिती घेतली जात असताना मतमोजणीतून बाहेर पडलेला निकाल आमदारांना पळताभुई थोडी करणारा ठरताना दिसून आला. निकालाची धास्ती इतकी जबरदस्त होती, की भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयाकडे पाठ फिरविली. ज्यांनी हजेरी लावली त्यांनी मुख्यालयातून काढता पाय घेतला.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम व तेलंगणा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होताच, विजयोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या गोटात सन्नाटा पसरला. सर्वांत मोठा धक्का शहरातील तिन्ही आमदार व त्यांच्या समर्थकांना बसला. त्याला कारण म्हणजे, निवडणुकांचे निकाल म्हणजे, मोदी लाट ओसरल्याचा परिणाम असून, आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांकडे कोणता मुद्दा घेऊन जायचा याची रणनीती आखणे सुरू झाले आहे. मागील विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतरही शहरात विकासकामांच्या बाबतीत छाप पाडता आली नाही. महापालिकेतील सत्ता विकासकामांऐवजी कधी आयुक्त हटाव मोहीम, तर कधी नगरसेवकांच्या आपसातील कुरबुरींमुळे गाजली.

भाजपपुढील डोकेदुखीचे मुद्दे
 आमदारांच्या आपसातील कुरबुरी
 संघटनात्मक निर्णयात खासदार बेदखल
 सततच्या मोर्चेबांधणीनंतर मंत्रिपदाने दिलेली हुलकावणी
 जिल्ह्यातील धरणांतून मराठवाड्याला सोडले जाणारे पाणी
 औद्योगिक विकासाचा आलेख उंचावण्यातील अपयश
 बांधकाम व्यवसायाच्या समस्यांची दुखरी नस 
 नाशिकमधील मिळकतींवर लादण्यात आलेली अवाजवी करवाढ
 शेतजमिनीवरील करवाढ
 सरकारी कार्यालयांची पळवापळवी
 एचएएल बळकटीकरणाचा प्रश्‍न
 क्रीडा प्रबोधिनीसह पळविलेल्या बोटी
 एकलहरे औष्णिक वीजनिर्मितीतील प्रश्‍न

भाजपने देशातील गोरगरीब जनतेला २०१४ मध्ये खोटी आश्‍वासने दिली. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, उद्योगांमध्ये वाढ करून युवकांना रोजगार, महागाईवर नियंत्रण आणणे, अशी आश्‍वासने न पाळल्याने नागरिक अडचणीत आले. त्यामुळे या निवडणुकांमधून जनतेने भाजपवर असलेला रोष दाखवून दिला. केवळ भूलथापा देऊन लोकांची मने जिंकता येत नाहीत, हे आजच्या निकालावरून दिसून आले.
- समीर भुजबळ, माजी खासदार

लोकधारेशी लबाडी करून जास्त काळ राज्यकारभार करता येत नाही, ज्यांनी लबाडी केली ते आजवर मागे गेले आहेत, आपण काय देऊ शकतो, केवळ तेच आश्‍वासन द्यावे. मतदारांच्या खात्यात १५ लाख, शेतकरी कर्जमुक्ती ही आश्‍वासने हवेतच विरली. 
- विजय करंजकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना

गत लोकसभा निवडणुकीनंतर, तसेच देशातील अन्य राज्यांमधील विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेली मोदी लाट ओसरून संपूर्ण देशात परिवर्तनाची लाट आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
- जयप्रकाश छाजेड, माजी आमदार

काँग्रेसची पुन्हा एन्ट्री देशासाठी घातक व धोकादायक आहे. काही काळापूर्वी ईव्हीएम मशिनवर शंका घेणारे आता त्यावर चर्चा करणार नाहीत. यापूर्वी पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी अनेक विजय मिळविले. या पराभवाचे आत्मपरीक्षण करून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी नेटाने कामाला लागू.
- लक्ष्मण सावजी, प्रदेश चिटणीस, भाजप

आजचा निकाल अपेक्षितच होता. पाच वर्षांपूर्वी १०० दिवसांच्या आत काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित दुप्पट भाव देऊ, अशा प्रचंड थापा मारून सत्तेवर आलेल्या सरकारने नवीन रोजगार तर सोडाच, आहे तो रोजगारही हिरावला.
-कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

२०१४ च्या निवडणुकीत विकासाचा भुलभुलय्या दाखवत सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी व भाजपला जनतेने नाकारले आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार व नोकरशहा यांची सरकारविरोधातील नाराजी या निवडणुकीतून प्रकट झाली. जे स्वप्न दाखविले होते, ते साफ खोटे असल्याने जनतेने त्यांना या निवडणुकीत नाकारले आहे.
- राजाराम पानगव्हाणे पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com