अकरावीच्या ४० हजार विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त विद्याशाखा अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, आतापर्यंत ९० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील महाविद्यालयांत असलेल्या सर्व विद्याशाखांच्या एकूण ४७ हजार ६३५ जागांपैकी ४० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत, तर सहा ते सात हजार प्रवेशाच्या जागा अजूनही भरलेल्या नाहीत.

जळगाव - अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त विद्याशाखा अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, आतापर्यंत ९० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील महाविद्यालयांत असलेल्या सर्व विद्याशाखांच्या एकूण ४७ हजार ६३५ जागांपैकी ४० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत, तर सहा ते सात हजार प्रवेशाच्या जागा अजूनही भरलेल्या नाहीत. प्रवेशप्रक्रिया सुरू असून, तिसऱ्या, चौथ्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू आहेत. तसेच, संस्थात्मक स्तरावरील जागांवरही प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शहरात अकरावीचे ३० हून अधिक महाविद्यालये असून, त्यात ७ हजार ८६० जागा उपलब्ध आहेत. त्यातील ८० टक्‍के विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत, तर जिल्हाभरातील कनिष्ठ महाविद्यालयांत एकूण ४० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. पहिल्या तिन्ही याद्यांतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता चौथ्या यादीतील तसेच संस्थात्मक स्तरावरील प्रवेश दिले जात आहेत. शहरातील काही महाविद्यालयांचा अपवाद वगळता इतर महाविद्यालयांत प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांत संधी आहे.

७५ टक्के प्रवेश झाल्यानंतर तासिका
चौथ्या यादीनंतर जागा रिक्‍त राहिल्यास महाविद्यालयांनी शनिवारपासून (ता. १३) रिक्‍त जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाविद्यालयांमध्ये ७५ टक्‍के प्रवेश झाल्यानंतर तासिका सुरू करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. याच कालावधीत बारावीची प्रवेशप्रक्रिया सुद्धा राबविण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh Admission Process Complete Student Education