Employee Strike : तिसऱ्या दिवशीही संप कायम; ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Employee Strike : तिसऱ्या दिवशीही संप कायम; ‘एकच मिशन जुनी पेन्शन’

Employee Strike : तिसऱ्या दिवशीही संप कायम; ‘एकच मिशन जुनी पेन्शन’

शहादा (जि. नंदुरबार) : संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करावी, यासाठी शासकीय कर्मचारी आंदोलन करीत आहेत. (employee Strike continued on third day in shahada nandurbar news)

शहादा तालुक्यातदेखील आंदोलनात अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना समाविष्ट झाल्या असून, तीव्र आंदोलने करण्यात येत आहेत. येथील पंचायत समितीच्या प्रांगणात शिक्षण, आरोग्य, महसूल, ग्रामपंचायतीसह अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांनी तिसऱ्या दिवशीही आंदोलन कायम ठेवले आहे. या आंदोलनात विविध संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

‘एकच मिशन जुनी पेन्शन’ असा नारा सरकारी कर्मचाऱ्यांकडून दिला जात आहे. २००५ नंतर शासकीय, निमशासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी कर्मचारी आक्रमक आहेत. मात्र शासन पातळीवरून यासाठी समिती गठीत करण्यात आली असून, या समितीच्या अहवाल आल्यानंतर त्या शिफारशीनुसार शासन निर्णय घेईल, असे शासन स्तरावरून सांगण्यात येत आहे.

मात्र याबाबत विविध संघटना व सरकार यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली असून, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तर शासनाकडून संप मागे घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे शहरातील अनेक शासकीय कार्यालयांत गुरुवारी (ता. १६) तिसऱ्या दिवशीही शुकशुकाट बघावयास मिळाला. बहुतांश कार्यालये कर्मचाऱ्यांअभावी ओस पडली होती. याचा परिणाम दैनंदिन कामकाजावरही झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

धडगाव येथे लाँग मार्च

राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी तिसऱ्या दिवशी धडगावात सीनिअर कॉलेजपासून ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत लाँग मार्च काढण्यात आला. या वेळी मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले.

यात महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. मोर्चात ‘एकच मिशन जुनी पेन्शन’, ‘जो पेन्शन की बात करेगा, वही देश पर राज करेगा’ आदी घोषणा देण्यात आल्या. यात ग्रामसेवक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, लिपिक संघटना, महसूल संघटना, तलाठी संघटना, शिक्षकभारती संघटना, अभियंता संघटना आदी संघटनांची लाँग मार्चमध्ये उपस्थिती होती.

"शासनाने गांभीर्याने घेऊन आम्हा २००५ नंतर नोकरीस लागलेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन लागू करावी."- धीरसिंग वसावे, जुनी पेन्शन संघटना तालुकाध्यक्ष, धडगाव