
Employee Strike : शासनाच्या निर्णयाची होळी; मागे न हटण्याचा निर्धार कायम!
धुळे : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी (employee strike) १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
बुधवारी (ता. १५) दुसऱ्या दिवशीही संप कायम राहिला. (employee strike for old pension scheme continued next day as well dhule news)
दरम्यान, संपावर तोडग्यासाठी राज्य शासनाने जुन्या पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयाची संपकरी कर्मचाऱ्यांनी बुधवारी येथे होळी केली.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. संपाचा बुधवारी (ता. १५) दुसरा दिवस होता. योजनेच्या अभ्यासासाठी राज्य शासनाने समिती नेमण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय आम्हाला मान्य नाही.
याआधीदेखील अशा समित्या स्थापन करून वेळकाढूपणा केला गेला. त्यामुळे आताच्या समितीचा निर्णयदेखील आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका सरकारी/निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक तथा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील पाटील यांनी मांडली.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
संपकरी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांनी कल्याण भवन येथे राज्य शासनाच्या समिती स्थापन करण्याच्या निर्णयाची होळी करत आपला विरोध व संताप व्यक्त केला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जनतेला त्रास होत आहे. त्याबद्दल आम्ही जनतेची माफी मागतो, आम्हाला संप करायचा नव्हता मात्र सरकारने आम्हाला संप करण्यास भाग पाडले, असेही डॉ. पाटील म्हणाले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, सरचिटणीस दीपक पाटील, कोशाध्यक्ष सुधीर पोतदार, राजेंद्र माळी, एस. यू. तायडे, सुरेश बहाळकर, योगेश जिरे, सुरेश पाईकराव, प्रशांत वाडेकर, दीपक रासने, पूनम पाटील, प्रतिभा घोडके आदी उपस्थित होते.
जि.प. कर्मचाऱ्यांचे आंदोलन
दरम्यान, राज्य शासनाच्या समिती गठीत करण्याच्या निर्णयाची संपकरी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनीही होळी केली. हे कर्मचारी येथील क्युमाइन क्लबसमोर आंदोलन करत आहेत. राज्य शासनाच्या या समितीमध्ये कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेतले नसल्यामुळे ही समिती आम्हाला मान्य नाही.
अशाच प्रकारची समिती २०१९ मध्येदेखील गठीत केली होती, असे म्हणत क्युमाइन क्लबजवळ आंदोलनास्थळी धुळे जिल्हा परिषद सर्व संवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. राज्यासह धुळे जिल्ह्यातही शंभर टक्के संप यशस्वी होत असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य अध्यक्ष बलराज मगर, दिनेश महाले, राजेंद्र नांद्रे, वनराज पाटील, सुनंदा निकम, डी. ए. पाटील, धीरज परदेशी, डी. एम. पाटील, किशोर पगारे, ज्ञानेश्वर बाविस्कर, सचिन गुंडेकर, रवींद्र खैरनार, दीपक महाले, मुकुंदा पगारे, संजय पाटील, नरहर पाटील, जयदीप पाटील, अनिलकुमार सोनवणे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते