Employee Strike : आंदोलनाचा चौथा दिवस; जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा आक्रोश! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

employee strike for old pension scheme employee angry nandurbar news

Employee Strike : आंदोलनाचा चौथा दिवस; जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा आक्रोश!

नंदुरबार : जुन्या पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) राज्यभर संप सुरू आहे. संपाबाबत ठोस निर्णय होत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह विविध शासकीय विभाग व शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आपल्या भावना शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. (employee strike for old pension scheme employee angry nandurbar news)

दरम्यान, मागण्यांचे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. सुमारे दहा हजारावर कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. विविध शासकीय विभागातील कर्मचारी संघटनांनी सहभाग घेत सर्व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील १८ लाख सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर कर्मचारी तीन दिवसापासून आंदोलनावर ठाम आहेत.

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झाले. नंदुरबार जिल्ह्यात संपामुळे काही शाळा बंद ठेऊन मुलांना सुट्टी देण्यात आली आहे. तर काही शाळा सकाळी भरल्या पण तिथे शिक्षकच आलेले नाहीत.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपाचा परिणाम रुग्णसेवेवर होताना दिसत आहे. काही विभागातील कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहून काळी फीत लावून आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेतर संघटना अनुदानित आश्रमशाळा यांनी ही सक्रिय सहभाग घेतला.

शिस्तबद्ध, शांततेत मोर्चा

एकच मिशन जुनी पेन्शन या एकमेव मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समिती नंदुरबार यांनी जुनी पेन्शनसाठी मोर्चा काढला. मोर्चा शिस्तबद्ध व शांततेत काढण्यात आला. येथील जुने पोलिस कवायत मैदान (नेहरू पुतळा) पासून मोर्चाला प्रारंभ झाला.

शहरातील गांधी पुतळा, हाट दरवाजा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, जळका बाजार, नवापूर चौफुली आदी मार्गांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्या नंतर निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खंदारे यांना समन्वय समिती मार्फत निवेदन देण्यात आले. मोर्चाला मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत देवकर, संदीप रायते, सुरेश भावसार, दादाभाई पिंपळे, गजानन नागरे आदींनी संबोधित केले.

"जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील, कर्मचारी आता माघार घेणार नाहीत. २८ मार्चपासून राजपत्रित अधिकारी देखील संपात सहभागी होणार आहेत." -संदीप रायते, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना

आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांसाठी पाणीवाटप

राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सामील झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना नंदुरबार जिल्ह्यातर्फे पाणीवाटप करण्यात आले. मोर्चा बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आल्यावर आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे सर्व कर्मचाऱ्यांना पाणीवाटप केले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष अभयसिंग चित्ते, सचिव भूपेंद्रकुमार चौधरी, हितेश सुगंधी, विजय कंखर, तुंबडू वाडीले, रियाज सय्यद, आदिनाथ खिल्लारे, युवराज भंडगर, योगेश वसावे, चेतन सोनजे, गोकुळ वाघ, के. डी. पवार, मनोज साळवे, विशाल पाटील आदींनी सहकार्य केले