
Employee Strike : संपकरी कर्मचाऱ्यांचा धुळ्यात महामोर्चा; संप फोडण्याचा डाव पण...
धुळे : जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या (Employee Strike) चौथ्या दिवशी (ता.१७) धुळ्यात महामोर्चा काढत कर्मचाऱ्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनासह एकजूट दाखविली.
आपापल्या ड्रेसकोडसह मोर्चात सहभाग नोंदवत कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला. (employee strike old pension scheme Marching in dhule news)
शहरातील संतोषी माता चौकाजवळील कल्याण भवन येथून मोर्चाला सुरवात झाली. या मोर्चात विविध संघटनांनी आपापल्या बॅनरसह व ड्रेसकोडसह मोर्चामध्ये ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’, ‘अभी नही तो कभी नहीं’, ‘पेन्शन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ आदी जोरदार घोषणा देऊन मोर्चेकरी कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.
मोर्चात कर्मचारी शिक्षकांमध्ये असलेल्या संतप्त भावनांचा उद्रेक, घोषणाबाजीत व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनोगतातून व्यक्त झाला. टॉवरबगीचा, आग्रारोड, झाशीराणी पुतळामार्गे मोर्चा जेलरोड येथे आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
या ठिकाणी समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. संजय पाटील, सुकाणू समितीचे सदस्य बलराज मगर, सरकारी कर्मचाऱ्यांचे अशोक चौधरी, एस. यु. तायडे, सुधीर पोतदार, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे दिनेश महाले, वनराज पाटील, माध्यमिक शिक्षक संघटनेचे संजय पवार, शिक्षक संघटना समन्वय समितीचे राजेंद्र नांद्रे, भूपेश वाघ, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे प्रा. बी. ए. पाटील, शिक्षक समितीचे राजेंद्र पाटील,
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
जि. प. आरोग्य कर्मचाऱ्यांचे डी. ए. पाटील, ग्रामसेवक संघटनेचे प्रभाकर भामरे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सुरेश पाईकराव, राजेंद्र माळी, दीपक रासने, सुरेश बहाळकर, भूषण पाटील, जि. प. कर्मचारी युनियनचे जयदीप पाटील, डी. एम. पाटील, किशोर पगारे, संजय गुंडलेकर, राहुल पवार, नरहर पाटील, ज्ञानेश्वर बाविस्कर आदींनी संबोधित केले. संपकऱ्यांना बेमुदत संप यशस्वी करू, मागण्या पदरात पडल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका व्यक्त केली.
संप फोडण्याचा डाव पण...
संपकऱ्यांनी यापूर्वी जुनी पेन्शन अभ्यास गटाच्या समितीच्या शासन निर्णयाचा, आउट सोर्सिंगद्वारे एक लाख कर्मचारी, अधिकारी व शिक्षक कंत्राटी पद्धतीवर भरण्यासाठी खासगी कंपन्यांना सेवाभरतीची ठेकेदारीचा झालेल्या शासन निर्णयाची होळी केली. तसेच कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याची भूमिका घेत अॅड. सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याबद्दल महिला कर्मचाऱ्यांनी अॅड. सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
सर्व कर्मचारी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे धोरण शासनाने जाहीर करावे या मागणीसाठी समन्वय समितीचा आग्रह असताना सरकार जाणीवपूर्वक संपकऱ्यांना चिथावणी देऊन संप फोडण्याचा डाव रचत आहे. जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याची घाई करणार नाही असे सरकारने स्पष्ट केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त लाट निर्माण झाली आहे. त्याउलट बेमुदत संपाची यशस्विता वाढल्याचे संपकरी कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे.