‘रोहयो’चे कामगार रमले प्रचारात

देविदास वाणी
शनिवार, 13 एप्रिल 2019

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) कामे मिळावीत म्हणून कामगारांचा कल वाढला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच, या कामगारांनी रोजगार हमीच्या कामांना रामराम ठोकून लोकसभा प्रचारात सहभाग घेतला आहे.

जळगाव - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) कामे मिळावीत म्हणून कामगारांचा कल वाढला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच, या कामगारांनी रोजगार हमीच्या कामांना रामराम ठोकून लोकसभा प्रचारात सहभाग घेतला आहे. म्हणूनच की काय, फेब्रुवारी महिन्यात दहा हजारांवर असलेली रोहयोच्या मजुरांची संख्या कमी होऊन आठ हजारांपर्यंत खाली घसरली आहे.

सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यांत रोहयोच्या मजुरांची संख्या तीन हजार होती. उन्हं तापू लागल्याने शेतात कामे नाहीत, वाळूचे लिलाव झालेले नव्हते. यामुळे बांधकामे बंद होती. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक रोजगार हमी योजनेच्या कामाकडे वळले होते. त्यात वाढ होऊन फेब्रुवारीत रोहयोमध्ये काम करणाऱ्यांची संख्या १० हजार ३४ वर पोचली होती. आता ती संख्या आठ हजारांवर आली आहे.

रोजगार हमी योजनेत २०३ रुपये रोजंदारी मिळते. मात्र, प्रचारासाठी महिला-पुरुषांना खाऊन पिऊन २५० ते ३०० रुपये रोजंदारी मिळते. 

सकाळी आठ-नऊ वाजता प्रचारासाठी यावे लागते. लागलीच त्यांना चहा, नाश्‍ता मिळतो. कोठे प्रचाराला जायचे तेथे जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था असते. दिवसभर उमेदवाराच्या मागे फिरत घोषणा द्याव्या लागतात. दुपारी जेवण मिळते. सायंकाळी रोजगार मिळाला की रोज पूर्ण होतो.

रोहयोअंतर्गत ही कामे... 
नर्सरी-रोपवाटिका तयार करणे, स्मशानभूमी सुशोभीकरण, वृक्ष लागवड, शौचालये बांधणे, गाळ काढणे, नाला खोलीकरण, सिमेंट नाला बंडिंग, विंधन विहीर करणे, शेततळे, नाल्यांतील गाळ काढणे आदी कामांचा रोजगार हमी योजनेत समावेश आहे.

रोजगार २०३ रुपये 
रोजगार हमी योजनेअंतर्गत कामगारास २०११-१२ मध्ये दर १२७ रुपये प्रतिदिवस होता. नंतर १२७, १८१, १९२, २०१ आता २०३ रुपये झाला आहे. महिला, पुरुषांना समान रोजगार दिला जातो. दर आठवड्यानंतर पेमेंट अदा केले जाते. कामगारांना आठवड्याचे वेतन मिळते. एक ते सात तारखेचे वेतन पुढील सात दिवसांत द्यावे लागते. ऑनलाइन पेमेंट झाल्याने या योजनेतील दलाली बंद झाली आहे. 

पैशांतील फरक...
२०३ रुपये रोहयोवरील रोजंदारी
२५०-३००रुपये प्रचारासाठीची रोजंदारी

Web Title: Employment Guarantee Scheme Labour Publicity