‘नवरंग’जवळील अतिक्रमणे हटविली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

धुळे - महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज देवपूरमधील नवरंग पाण्याच्या टाकीजवळील महापालिकेच्या जागेवरील फळ- भाजी विक्रेत्यांसह इतर व्यावसायिकांची दुकाने, टपऱ्यांसह काही रहिवासी झोपड्या, अशी एकूण ४९ अतिक्रमणे हटविली. रस्त्यालगत ही दुकाने, त्यांच्यासमोर पार्किंग, यामुळे वाहतुकीचा प्रश्‍नही गंभीर ठरत होता. 

धुळे - महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज देवपूरमधील नवरंग पाण्याच्या टाकीजवळील महापालिकेच्या जागेवरील फळ- भाजी विक्रेत्यांसह इतर व्यावसायिकांची दुकाने, टपऱ्यांसह काही रहिवासी झोपड्या, अशी एकूण ४९ अतिक्रमणे हटविली. रस्त्यालगत ही दुकाने, त्यांच्यासमोर पार्किंग, यामुळे वाहतुकीचा प्रश्‍नही गंभीर ठरत होता. 

महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी काही दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाबाबत संबंधित विभाग कार्यवाही करत नसल्याने अधिकाऱ्यांना दंड, नोटिसा बजावल्या. नंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक कारवाई सुरू केली. या मोहिमेत देवपूरमधील नवरंग पाण्याच्या टाकीजवळील महापालिकेच्या जागेवर तसेच एसएसव्हीपीएस महाविद्यालयासमोरील रस्त्याला लागूनच दुकाने थाटणाऱ्यांवर कारवाई झाली. या ठिकाणी फळ विक्रेते, भाजी विक्रेते, क्रिकेट बॅट व इतर साहित्य बनविणारे, माठ विक्रेते, चहाच्या टपऱ्या आदी व्यावसायिकांची छोटी- मोठी दुकाने (टपऱ्या) होती. त्यांच्या मागील बाजूला काही जणांनी पत्र्याचे शेड करून रहिवासी झोपड्याही उभारल्या होत्या. रस्त्याला लागून असलेल्या या अतिक्रमणामुळे रहदारीलाही अडथळा ठरत होता. शिवाय महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण होते.

४९ दुकाने, टपऱ्या हटविल्या

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सकाळी अकराला येथे कारवाई सुरू करत फळ-भाजी विक्रेत्यांसह इतर व्यावसायिकांची दुकाने, टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यास सुरवात केली. काही टपऱ्या हटविल्यानंतर इतर व्यावसायिकांनी आपापली दुकाने, टपऱ्या काढून घेण्यासाठी मुदत मागितली. पथकाने मुदत दिल्यानंतर संबंधितांनी आपापल्या दुकानांचे साहित्य काढून घेतले. काही जणांनी तेथे रहिवासी अतिक्रमणही केले होते. त्यांनाही तेथून हटविण्यात आले. एकूण ३३ दुकाने, टपऱ्या, तसेच १६ रहिवासी झोपड्या अशी ४९ अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने सांगितले. उपायुक्त रवींद्र जाधव, अभियंता कैलास शिंदे, अतिक्रमण निर्मूलन पथकातील नंदू बैसाणे, मधुकर निकुंभे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आयुक्त धायगुडे यांनीही कारवाईची पाहणी केली. सायंकाळी पाच-सहापर्यंत ही कारवाई सुरू होती. नवरंग पाण्याच्या टाकीजवळ महापालिकेची जागा आहे. या ठिकाणी रस्त्याला लागून व्यापारी संकुलही प्रस्तावित आहे. देवपूरमध्ये रस्त्यालगत अतिक्रमणांच्या संख्येत वाढ होत असल्याने अपघाताची संख्या बळावणे, वाहतुकीची कोंडी होण्यासह विविध प्रश्‍न ऐरणीवर आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने व्यावसायिकांना शिस्त लावण्याची गरज व्यक्त होते. 

उपाययोजनेची गरज
महापालिकेने आज कारवाई झालेल्या ठिकाणी यापूर्वीही कारवाई केली होती. जेसीबीच्या सहाय्याने तेथे जागेचे सपाटीकरणही करण्यात आले होते. काही दिवसांनी मात्र तेथे पुन्हा व्यावसायिकांनी दुकाने थाटली. त्यामुळे पुन्हा तशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होते.

Web Title: The encroachment was removed near Navrang