अंदाजपत्रक मंजुरीसाठी लाच मागणारा उपकार्यकारी अभियंता खैरनार गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मनमाड - येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार यांना ठेकेदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कार्यालयातच रंगेहाथ पकडले. 

मनमाड - येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता धनंजय खैरनार यांना ठेकेदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कार्यालयातच रंगेहाथ पकडले. 

शहरातील एका इलेक्‍ट्रिकल ठेकेदारास शिंगवे (ता. चांदवड) येथील लॉन्सकरिता थ्री फेस एलटी लाइन कमर्शियल मीटर आणि दोन पोल टाकून त्यावर वीजतारा बसवून वीजपुरवठा जोडण्यासाठी ठेका मिळाला होता. सदर ठेक्‍याचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी शहरातील उपकार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेले आणि नेहमी वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेले धनंजय खैरनार यांनी तक्रादार यांच्याकडे 15 हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु, तक्रारदार यांची खैरनार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज दुपारी उपकार्यकारी अभियंता खैरनार यांना कॅम्प विभागातील कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. कारवाईत नाशिक परिक्षेत्राचे अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, प्रभारी अप्पर पोलिस अधीक्षक प्रभाकर घाडगे, उपअधीक्षक सुनील गांगुर्डे, पोलिस निरीक्षक महेश भोरट्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पवन देसले, लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे जितेंद्र परदेशी, किरण साळी आदींच्या पथकाने कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Engineer Khairnar Ghazaad