अस्वच्छतेने एरंडोलकरांचे आरोग्य "सलाइन'वर! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

एरंडोल - शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून, मोठ्या गटारी व नाले तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. असे असूनही पालिकेने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे एरंडोलकरांचे आरोग्य "सलाइन'वर आहे. याबाबत पालिकेने शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून तुंबलेल्या गटारींची सफाई करून प्रमुख रस्त्यांवर जमा झालेला केरकचरा उचलावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. 

शहरातील अमळनेर दरवाजा परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाली असून, परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे नाइलाजास्तव उघड्यावरच प्रात:र्विधी करावा लागत आहे. परिसरातील नाल्यात केरकचरा व घाण जमा झाली असून, सांडपाणी रस्त्यावर येत आहे. नाले व गटारी तुंबल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. तेथे अन्न शोधासाठी डुकरे मोकाट कुत्रे व जनावरांचा मुक्त संचार वाढला असून, जनावरे कचऱ्याचा ढीग रस्त्यावर पसरवतात. परिणामी पादचाऱ्यांना विशेषतः महिला व बालकांना त्रास सहन करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व महात्मा फुले पुतळा परिसरात जमा होत असलेला केरकचरा नियमितपणे उचलून परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. 

कुत्र्यांचा हैदोस 
शहरात गटागटाने फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेने भटक्‍या कुत्र्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरासह नवीन वसाहतींमध्ये पंधरा ते वीस मोकाट कुत्र्यांचा गट ठिकठिकाणी एकत्रित राहत असून, परिसरातून जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मागे ती लागतात. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. पादचाऱ्यांच्या अंगावरही कुत्रे धावून येत असल्यामुळे महिला व मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत पालिकेच्या स्वच्छता विभागाने त्वरित लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही शहरवासीयांनी केली आहे. 

Web Title: Erondol citizen health issue