शासनाकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

खेमचंद्र बिऱ्हाडे यांची भाक्षी येथे डाळिंब बाग आहे. या डाळिंब बागेस ता.२२ एप्रिल २०१७ रोजी वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. या आगीत बिऱ्हाडे यांची जवळपास सर्वच डाळिंब बाग भस्मसात झाली होती. घटनेनंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून जळालेल्या झाडांचा मूल्यमापन अहवाल सादर करण्यासाठी कृषी विभागाशी पत्रव्यवहार केला होता.

सटाणा : भाक्षी (ता.बागलाण) येथील खेमचंद्र यशवंत बिऱ्हाडे (वय ४५) या शेतकऱ्याने जळालेल्या डाळिंब बागेची शासनाकडून नुकसानभरपाई मिळत नसल्यामुळे काल बुधवार (ता.२४) रोजी येथील तालुका कृषी कार्यालयात विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे बागलाण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. 

याबाबतचे वृत्त असे, खेमचंद्र बिऱ्हाडे यांची भाक्षी येथे डाळिंब बाग आहे. या डाळिंब बागेस ता.२२ एप्रिल २०१७ रोजी वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. या आगीत बिऱ्हाडे यांची जवळपास सर्वच डाळिंब बाग भस्मसात झाली होती. घटनेनंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून जळालेल्या झाडांचा मूल्यमापन अहवाल सादर करण्यासाठी कृषी विभागाशी पत्रव्यवहार केला होता. कृषी विभागाने ५५० पैकी ३३० झाडे जळाल्याच्या अहवालासोबत त्यावेळी डाळिंबाला असलेल्या बाजारभावावरून नुकसानीचा मूल्यमापन अहवाल देखील वीज वितरण कंपनीला पाठविला होता. त्यानुसार खेमचंद्र बिऱ्हाडे यांना वीज वितरण कंपनीकडून नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी या नुकसान भरपाईसाठी तालुका कृषी कार्यालयाकडे तगादा लावला. अखेर आज त्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयातच विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यालयात असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून बिऱ्हाडे यांच्याकडील विषारी औषधाची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी उपस्थित असलेल्या बिऱ्हाडे यांच्या नातेवाईकांची कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समजूत काढली.

Web Title: esakal marathi news farmer suicide attempt