ट्रॅक्टर व ट्रेलरची येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी न केल्यास कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी नसलेल्या सर्व ट्रॅक्टर व ट्रेलरची नोंदणी करून घ्यावी. अन्यथा अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मालेगाव विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तुषार मिस्त्री यांनी काल बुधवार (ता.२४) रोजी येथे दिला.

सटाणा : रात्री अपरात्री होणाऱ्या अपघातांमधील जीवितहानी टाळण्यासाठी प्रत्येक वाहनधारकाने वाहनास रेडियम रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी नसलेल्या सर्व ट्रॅक्टर व ट्रेलरची नोंदणी करून घ्यावी. अन्यथा अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मालेगाव विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तुषार मिस्त्री यांनी काल बुधवार (ता.२४) रोजी येथे दिला.

रिगलदेवा सार्वजनिक वाचनालय व साई ट्रेलर यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथील शासकीय विश्रामगृहावर वाहतूक सुरक्षा सप्ताह अंतर्गत वाहनांना परावर्तक पट्ट्या (रेडियम रिफ्लेक्टर) लावणे व १३ महिन्यांपासून बंद असलेल्या वाहन नोंदणीची सुरुवात श्री. मिस्त्री यांच्या हस्ते झाली. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निशिकांत वैद्य, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष व रिगलदेवा सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, साई ट्रेलरचे संचालक प्रवीण सूर्यवंशी, किशोर ह्याळीज आदी उपस्थित होते. श्री.मिस्त्री म्हणाले, जीवन ही अमुल्य देणगी असून वाहन चालविताना वाहनधारकांनी सुरक्षेसाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे.

प्रत्येक मनुष्याचे जीवन हे सामाजिक आणि कौटुंबिकदृष्ट्या असाधारण असे आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून आपल्या समाजासाठी व कुटुंबासाठी जबाबदारीचे भान निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. अनेक ट्रॅक्टर व ट्रेलरला रेडियम रिफ्लेक्टर नसल्याने रात्री अपरात्री होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. विनानोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली असून यानंतर नोंदणी नसलेले वाहन रस्त्यावर आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर नियमानुसार नोंदणी क्रमांक प्रदर्शित करावे व रेडियम रिफ्लेक्टर लावावत असे आवाहनदेखील श्री.मिस्त्री यांनी केले. 

कार्यक्रमास सुभाष बच्छाव, संदीप भामरे, संजय काकडे, सुनील गोसावी, रऊफ शेख, डॉ.प्रकाश सोनवणे, शंतनू सोनवणे, मोंटू पठाण, गोकुळ अहिरे, विकी सोनवणे आदींसह वाहनचालक बहुसंख्येने उपस्थित होते. 

 

Web Title: esakal marathi news satana news rto

टॅग्स