हिंस्र श्वापदाच्या हल्ल्यात 22 मेंढ्यांचा मृत्यू तर 3 मेंढ्या जखमी

प्रा.भगवान जगदाळे
शनिवार, 29 जुलै 2017

एका मेंढीची किंमत सुमारे दहा ते बारा हजार रुपये आहे. या घटनेत सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून जैताणेचे तलाठी बी. व्ही. रोझेकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गावीत, वनविभागाचे कर्मचारी श्री.सोनवणे व पोलीस कर्मचारी आदींनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला.

निजामपूर : माळमाथा परिसरातील जैताणे(ता.साक्री) येथील भिलाटीत राहणारे आदिवासी मेंढपाळ दीपक राजू भिल यांच्या मालकीच्या 22 मेंढ्या आज मध्यरात्रीच्या सुमारास हिंस्र श्वापदाच्या हल्ल्यात मृत्यमुखी पडल्या तर 3 मेंढ्या जखमी झाल्या. एका मेंढीची किंमत सुमारे दहा ते बारा हजार रुपये आहे. या घटनेत सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून जैताणेचे तलाठी बी. व्ही. रोझेकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गावीत, वनविभागाचे कर्मचारी श्री.सोनवणे व पोलीस कर्मचारी आदींनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला.

नबाबाईला अश्रू अनावर...
दररोज रात्री उशिरापर्यंत दीपक भिल व राजू भिल हे आपल्या आखाडे रोडवरील मेंढ्यांच्या वाड्यावर थांबायचे. पण आज रात्री पावसाची रिपरिप सुरू असल्याने ते दहा-अकराच्या सुमारासच घरी झोपायला गेले. सकाळी पाच-सहा वाजेच्या सुमारास घडलेला प्रकार लक्षात आला. हे सर्व पाहून मेंढपाळाची आजी नबाबाई व आई कस्तुराबाई या दोघांना शोक अनावर झाला व कुटुंबातील सदस्य गेल्याप्रमाणे हंबरडा फोडून त्या रडू लागल्या. रडण्याचे कारण केवळ झालेले नुकसान नव्हते तर त्यातील बहुतेक मेंढ्या ह्या गाभण/गरोदर होत्या. व काही दिवसातच त्या प्रसूत होणार होत्या. या हल्ल्यात एका मेंढीच्या पोटातून तर चक्क एक मृत पिलूच बाहेर आलेले होते. नबाबाई व कस्तुराबाई आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेत होत्या. दीपक भिल व राजू भिल हे दिवसभर रानावनात मेंढ्या चारायचे. तर दररोज सायंकाळी मेंढ्या यायच्या आधी वाड्याची साफसफाई करून आपल्या मुलींप्रमाणे त्या मेंढ्यांची वाट बघायच्या. उपजीविका भागविण्यासाठी मोलमजुरी करणाऱ्या नबाबाई व कस्तुराबाई या दोघी सासू-सुनांनी सुरुवातीला पोटाला चिमटा देऊन 20-25 शेळ्या विकत घेऊन शेळीपालन सुरू केले होते. पण शेळीपालनापेक्षा मेंढीपालनात उत्पन्न अधिक मिळते हे लक्षात आल्यावर त्यांनी अडीच-तीन वर्षांपूर्वी शेळ्या विकून 20-25 मेंढ्या विकत घेतल्या होत्या. आज ती संख्या सुमारे 50 वर गेली होती. पण अचानक आलेल्या या आपत्तीमुळे त्यांची एवढी मेहनत वाया गेली. त्यांना शासनाने योग्य प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी अशी प्रतिक्रिया सरपंच संजय खैरनार, उपरपंच आबा भलकारे, परशराम खलाणे, आबा भिल, श्री.भदाणे आदींनी 'सकाळ'शी बोलताना दिली. हा हल्ला लांडग्यांनी केला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. वनविभागाने यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मेंढपाळांसह ग्रामस्थांची मागणी आहे.

​यावेळी सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार, ईश्वर न्याहळदे, परशराम खलाणे, प्रकाश गवळे, आबा भिल, न्हानू महाले आदी उपस्थित होते. मृत मेंढ्या पाहण्यासाठी सकाळी परिसरातील मेंढपाळ व ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती.

 

Web Title: esakal news sakal news dhule news