रेकॉर्ड न तपासता ईएसआयसी नोंदणी करणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

जळगाव - ईएसआयसीअंतर्गत ज्या कारखानदार, संस्थांनी कामगारांची नोंदणी केली नसेल, त्यांचे मागील रेकॉर्ड न तपासता नोंदणी करून घेता येईल. त्यामुळे अशा संस्थाचालकांनी विभागाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ईएसआयसीचे औरंगाबाद विभागाचे प्रमुख पी. सुदर्शन यांनी केले. लघुउद्योग भारतीतर्फे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री. सुदर्शन बोलत होते. 

हॉटेल मैत्रेयाज्‌मध्ये आज दुपारी लघुउद्योग भारतीच्या वतीने ईएसआयसीअंतर्गत कायद्यात झालेले बदल, नवीन अध्यादेशांबाबत कारखानदार, संस्थाचालकांना माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेला अंजनीकुमार मुंदडा, राजीव बियाणी, संजय तापडिया, पुरुषोत्तम न्याती, रवींद्र लढ्ढा आदी उद्योजकांसह कंपन्यांचे प्रतिनिधी, ईएसआयसीचे एसएसओ व्ही. व्ही. भाबडा, जळगाव येथील शाखा व्यवस्थापक संजय गुरव आदी उपस्थित होते. 

नोंदणीसाठी आवाहन 
उद्योग, कारखानदार, संस्थाचालकांना ईएसआयसीअंतर्गत कामगारांची नव्याने नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. या योजनेत २० डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ अंतर्गत नोंदणी करता येणार आहे, त्यासाठी विभाग उद्योग वा संस्थांचा पूर्वीचा रेकॉर्ड तपासणार नाही. त्यामुळे कारखानदारांनी या योजनेचा लाभ घेऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कार्यशाळेतून करण्यात आले. 

तिघा लाभार्थींचा प्रस्ताव मंजूर 
काम करत असताना मृत्यू झालेल्या तिघा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ईएसआयसीतर्फे दिल्या जाणाऱ्या क्‍लेमच्या रकमेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यात श्रीराम फायनान्सचे कर्मचारी राजेंद्र पाटील यांच्या पत्नी ममता यांना ९१ हजार १५६ रुपयांचा धनादेश देण्यात आला. दिलीप किसन बोरनारे व सिद्धार्थ इंडस्ट्रीचे अब्दुल युनूस गनी यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले, मात्र त्यांची रक्कम अद्याप निश्‍चित नसल्याने धनादेश देण्याची प्रक्रिया बाकी आहे.

Web Title: esic registration without record cheaking