भाजीपाल्याचे भाव पाडत शेतकऱ्यांची पिळवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

गेल्या आठवड्यातपर्यंत आम्ही 20 हजारांत टेम्पोभर कोबी विकायचो. आता निम्मेच पैसे मिळाले. पावसामुळे तोडलेली कोबी परत नेता येत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संघटितपणे भाव पाडण्याचे सत्र सुरू ठेवल्यास शेतकऱ्यांनी काय करायचे? हा प्रश्‍न आहे. लिलाव बंद होण्यापूर्वीचा भाव यापुढील काळात मिळाल्यास उत्पादन खर्चाची तोंडमिळवणी करणे शेतकऱ्यांना शक्‍य आहे. तसे न झाल्यास दुहेरी नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.
- गणेश माळोदे, शेतकरी, आडगाव

नाशिक : येथील बाजार समितीच्या आवारात लिलावाला सुरवात होताच आज सातव्या दिवशी आवार शेतमालासह शेतकऱ्यांनी फुलून गेले. रांगेत लागलेला भाजीपाला, गाडीतून आलेला भाजीपाला उतरवण्यासाठी हमालांची लगबग, अडत्यांच्या लिलाव पुकारा, असे उत्साहाचे वातावरण राहिले. मात्र, व्यापाऱ्यांनी शेतमालाचे भाव पाडून पिळवणूक सुरू केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. त्याचवेळी अडत शेतकऱ्यांकडून घ्यावी, या मुद्द्यावर कांदा व्यापारी अडकून बसल्याने कांद्याचे लिलाव थांबले आहेत.

लिलाव अन्‌ सौदापट्टी झाल्यावर रोख पैसे शेतकऱ्यांना मिळत होते. सौदापट्टीवर पहिल्यांदाच अडतीच्या जागेवर रक्कम लिहिली नसल्याने शेतकऱ्यांचे चेहरे फुलून गेले होते. अडत शेतकऱ्यांकडून वसूल न करण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आणि बाजार समितीने केलेल्या अंमलबजावणीचे शेतकऱ्यांनी स्वागत केले.

निम्म्याने भाव पाडण्याची खेळी
कारल्याची आवक कमी असताना स्थानिक आणि जिल्हाबाहेरील बाजारातून मागणी वाढली आहे. "बंद‘पूर्वी कारल्याला दहा किलोच्या क्रेटला पाचशे ते एक हजार आणि सरासरी 800 रुपये भाव मिळत होता. आज मात्र कारल्याची विक्री शेतकऱ्यांना 300 ते 800 आणि सरासरी 525 रुपये प्रतिक्रेट्‌स अशी करावी लागली. कारल्याच्या दहा किलोमागे 300 रुपयांनी भाव पाडल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच टेम्पोभर कोबी 20 हजारांऐवजी दहा हजारांत खरेदी केला गेल्याने शेतकऱ्यांची नाराजी लपून राहिली नाही. इतर भाजीपाल्याचे दर 30 टक्‍क्‍यांपर्यंत पाडण्यात आले. दर पाडणाऱ्या व्यापाऱ्यांवर पणन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
 

शेतकऱ्यांसह बाजार समित्यांचे नुकसान
नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला आणि फळे बाजारातील लिलाव पूर्ववत झाले असले तरी जिल्ह्यातील कांदा बाजारातील तिढा अद्याप सुटलेला नाही. कांद्याच्या अडतीची वसुली शेतकऱ्यांकडूनच करावी, व्यापारी देणार नाही, या भूमिकेवर कांदा व बटाटा संघटना अडून बसली आहे. जिल्ह्यातील 15 बाजार समित्या आणि 45 उपबाजारांतून रोज सरासरी एक लाख क्विंटल कांद्याची आवक होते.
 

 

Web Title: Exercise prices of vegetables the farmers exploitation