मालेगावात बिबट्याला पकडण्यात वनविभागाची सुस्ती; ग्रामस्थ संतापले

दीपक खैरनार
रविवार, 1 जुलै 2018

बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत वन विभाग मात्र सुस्तचं असून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अंबासन (जि. नाशिक) - दुंधे (ता. मालेगाव) गाव व परिसरात बिबट्याचा धुमाकुळ सुरूच असून तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात दहा शेळ्यांचा बळी गेलेला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत वन विभाग मात्र सुस्तचं असून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

येथील शेतकरी शांताराम खैरनार यांच्या शेतात आज पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दहा शेळ्या ठार झाल्या. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाचारण करून पंचनामा केला. या परिसरात बिबट्याचा नेहमीच वावर असल्याने वनविभागाने यावर उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. वेगवेगळ्या आजारांमुळे पशुधन संख्या घटत असतांनाच बिबट्याच्या हल्ल्यात जनावर ठार होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच वनविभागाकडून नुकसान भरपाई देखील मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.

गेल्या दोन महिन्यांपूर्वीच तळवाडे (ता. बागलाण) येथे एका लहान मुलाला बिबट्याने ठार करून एकाला मुलीला जखमी केले होते. अंबासन गावातील शेतकरी संजय कोर यांच्या गाईचे वासरु फस्त केले. ईजमाने शिवारातून शेती काम करणारा गोरा बिबट्याने ठार केला आहे. तसेच तळवाडे गावातील सुदाम पांडुरंग अहिरे यांच्या दोन पाळिव घोडयावर बिबट्याने हल्ला केला आहे. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री यांनी या भागाचा दौरा करुन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याचा बंदोबस्त करण्याची तंबी देवून सुद्धा वन कर्मचाऱ्यांना बिबट्या पकडण्यात अपयश आल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात वनखात्याबद्दल तीव्र संताप व्यक्त झाला आहे. परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झालेले दिसत आहे. या परिसरात किमान चार ते पाच बिबटे असल्याचा अंदाज व्यक्त होत असून वन विभागाने तात्काळ या भागात पिंजरा बसवून रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी परिसरातून होत आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: failure of forest department to catch a leopard in Malegaon