
अनुषा, रघुवंशी आणि कोट्टी रेड्डी या तिघांनाही पोहता येत नव्हते. डोहाजवळील दगडावर तीनपैकी दोन मोबाईल सापडले आहेत. त्यामुळे डोहाजवळील एका खडकावर हे तिघे सेल्फी घेत असताना यातील एकाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. पडलेल्यास वाचविताना दोघेही पाण्यात पडले.
नाशिक : औरंगाबाद येथून दुगारवाडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे धबधब्यावर फिरण्यासाठी आलेल्या तिघांचा मृत्यू सेल्फी काढतानाच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. युवती अनुषा गोरांतला हिचा मृतदेह बुधवारी (ता.18) रात्रीच हाती लागला होता, तर उर्वरित दोघांचे मृतदेह चांदोरीच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी कठोर मेहनत करून शोधून बाहेर काढले. गुरुवारी रात्री उशिरा तिघाही मृतदेहांचे विच्छेदन करून नातलगांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
अशी घडली घटना...
औरंगाबाद येथील कांचीवाडी येथील सीएसएमएसएस कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणारे गिरीधर आकाश (वय 20), कैपू व्यंकटेश्वरा रेड्डी (20, दोघे रा. तेलंगणा), काव्या लक्ष्यशेट्टी (20, रा. हैदराबाद), अनुषा गोरांतला (21), रिम्मालापुडी रघुवंशी (21), उप्पाला कोटी रेड्डी (20, तिघे रा. तेलंगणा) हे सहा विद्यार्थी गेल्या सोमवारी (ता. 15) सुला वाइन येथे फिरण्यासाठी आले होते. औरंगाबाद येथून हे सहाही जण दुचाकीवरून आले. मंगळवारी (ता. 17) दुपारी ते त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी आले. अनुषा, रघुवंशी आणि कोट्टी रेड्डी हे तिघे धबधबा पाहायला गेले, तर उर्वरित तिघे डोंगरावरच थांबले. अनुषा, रघुवंशी आणि कोटी रेड्डी यांचे मृतदेह धबधब्यात बुधवारी (ता. 18) रात्रीच सापडले होते. पथकाने धबधब्याजवळ पोचून बुधवारी रात्री उशिरा अनुषाचा मृतदेह बाहेर काढला. जिल्हा प्रशासनाने शोधमोहिमेसाठी चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले. अंधार व थंडगार पाण्यामुळे रात्री शोधमोहीम थांबविण्यात आली.
गुरुवारी (ता. 19) सकाळी साडेअकराच्या सुमारास रघुवंशीचा मृतदेह डोहातून प्रथम बाहेर काढण्यात आला, तर दुपारी दोनच्या सुमारास कोट्टी रेड्डी याचा मृतदेह बाहेर काढला. हे मृतदेह डोंगरकपारीच्या चिंचोळ्या मार्गाने मोठी कसरत करीत वर आणण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, चांदोरीचे बचाव पथकातील सागर गडाख, वैभव जमदाडे, सुरेश पगारे, शुभम गारे, सुरेश शेटे यांनी अथक परिश्रम घेतले. जिल्हा रुग्णालयात तिन्ही मृतदेहांचे गुरुवारी रात्री विच्छेदन करून नातलगांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
सेल्फी काढतानाच...
अनुषा, रघुवंशी आणि कोट्टी रेड्डी या तिघांनाही पोहता येत नव्हते. डोहाजवळील दगडावर तीनपैकी दोन मोबाईल सापडले आहेत. त्यामुळे डोहाजवळील एका खडकावर हे तिघे सेल्फी घेत असताना यातील एकाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. पडलेल्यास वाचविताना दोघेही पाण्यात पडले आणि त्यांना कोणालाही पोहता येत नसल्यानेच त्यांना आपला जीव गमवावा लागला, या निष्कर्षापर्यंत पोलिस आले. ही घटना सेल्फी काढतानाच घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिघांच्याही नातलगांना मोठा धक्का बसला होता. तिघांचेही कुटुंबीय सर्वसामान्य शेतकरी असून, त्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते.
हेही वाचा > video > स्मशानभूमीत केला वाढदिवस साजरा...त्यानंतर अचानक
हेही वाचा > हळदीत नाचताना फक्त धक्का लागला..अन् थेट हल्लाच..थरार...
वन विभागाचा हलगर्जीपणा...
ज्या क्षेत्रात ही घटना घडली त्या वन विभागाचा एकही अधिकारी वा कर्मचारी याकडे फिरकला नाही. एरवी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होत असल्याने त्यांच्याकडून शुल्क वसुली करणे आणि दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी करणाऱ्या वन विभागाने धोकादायक धबधब्याजवळ कोणत्याही सूचना वा उपाययोजना केलेल्या नाहीत. या संदर्भात ग्रामीण पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
हेही वाचा > मैत्रीत दगा...मित्राचाच मृतदेह टाकला शौचालयाच्या टाकीत...पण का?
याठिकाणी कोणतेही धोकादायक सूचनांचे फलक वा उपाययोजना नाही
तिन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू डोहात बुडून झालेला असून, सेल्फी काढतानाच ही दुर्घटना घडल्याची जास्त शक्यता आहे. मात्र, यास वन विभागही तितकाच जबाबदार आहे. या ठिकाणी कोणत्याही धोकादायक सूचनांचे फलक वा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याबाबत पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. - भीमाशंकर ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी, नाशिक ग्रामीण