‘नरेगा’तून शेतकऱ्यांना लाखाे रुपयांचा मिळाला रोजगार
शेतकऱ्यांना हेक्टरी बांधावर २० आंब्याची लागवड करण्यासाठी अंदाजे ३२ हजार रुपये मंजुरी मिळाली आहे. यातून आसाणे गावात तब्बल ४० लाख रुपयांची रोजगारनिर्मिती ग्रामपंचायत करू शकली आहे.
न्याहली ः रोजगार हमी योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मोठी लाभदायक ठरत आहे. शेतकऱ्यांना बांधावर हेक्टरी २० आंब्यांच्या लागवडीसाठी अंदाजे ३२ हजार रुपये मंजुरी मिळाली आहे. यातून आसाणे (ता. नंदुरबार) गावात तब्बल
४० लाख रुपयांची रोजगारनिर्मिती ग्रामपंचायतीने केली आहे.
आसाणेचे सरपंच चंद्रकांत पाटील यांनी रोजगार हमी योजनेतून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला व कृषी विभागामार्फत बांधावर फळबाग लागवडीसाठी सागर पाटील यांना प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. त्यासाठी लागणारे इस्टिमेट कृषी सहाय्यक बादल बंजारा यांनी केले. गावातून एकूण ११४ प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठविण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालून तालुका कृषी अधिकारी रामू पवार यांना तांत्रिक मंजुरी देण्याचे आदेश दिले. प्रशासकीय मान्यता उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी दिली. शेतकऱ्यांना हेक्टरी बांधावर २० आंब्याची लागवड करण्यासाठी अंदाजे ३२ हजार रुपये मंजुरी मिळाली आहे. यातून आसाणे गावात तब्बल ४० लाख रुपयांची रोजगारनिर्मिती ग्रामपंचायत करू शकली आहे.
असे आहे नियोजन
प्रथम वर्षाला शेतकऱ्यांना अंदाजे १८ हजार रुपये मिळतील. वर्षाला सात हजार रुपये व तिसऱ्या वर्षाला सात हजार रुपये मिळतील. यातून शेतकऱ्यांना फळांचे उत्पादन घेऊन उत्पन्नात वाढ होईल. फळबाग लागवडीसाठी मंडलाधिकारी पी. एच. धनगर व एम. जी. धोत्रे शेतकऱ्यांना लागवडीसाठी व झाडांचे संगोपन करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. मागील वर्षी रोजगार हमी योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला गांडूळ युनिटसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये मंजूर करून दिले होते. त्यातून गावात आठ लाख रुपयांचा रोजगार निर्माण करण्यात आला होता. यातून शेतकऱ्यांना गांडूळखत तयार करून शेतीसाठी उपयोग होत आहे. भविष्यात जास्तीचे खत तयार करून शेतकरी गटामार्फत पॅकिंग करून बाजारात विकण्यासाठी ग्रामपंचायत योजना करीत आहे.
भविष्यात प्रत्येक योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम करणार आहे. शेतकऱ्यांना शेती जोडव्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी काम करणार आहे.
-चंद्रकांत पाटील, सरपंच, आसाणे