शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

संपादित जमिनींचा समन्यायी पद्धतीने मोबदला द्या; कार्यालयातच अधिकाऱ्यांशी वादही

धुळे - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत त्यांना मोबदला देताना काही शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना समन्यायी पद्धतीने मोबदला द्यावा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठत न्यायाची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी वाद झालेल्या शेतकऱ्यांनी नंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या. मोजणी करताना जास्त शेतजमिनी संपादित केल्या गेल्या, अशा शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य आर्थिक मोबदला मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांना नवीन कायद्यानुसार मोबदला दिला गेला. एकाच प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना दोन प्रकारे आर्थिक मोबदला दिला गेल्याने शेतकऱ्यांमध्येच दरी निर्माण केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सर्व शेतकऱ्यांना समन्यायी पद्धतीने मोबदला दिला जावा यासाठी मंत्री, अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. निवेदने दिली. मात्र, त्याचा विचार केला गेला नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीने चार मार्चला आंदोलनाचा इशारा दिला होता. २४ मार्चला १४० किलोमीटर अंतरावर चौपदरीकरणाचे काम बंद पाडण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावून दोन तास चर्चा करून महिन्याच्या आत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन दिले होते.

मात्र, आश्‍वासनांची पूर्तता झाली नाही. २५ एप्रिलला या संदर्भात पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाकडे मागण्यांचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. मागण्यांबाबत चालढकल सुरू असल्याचे आमच्या लक्षात आल्याचे संघर्ष समितीने म्हटले आहे.

दहशतीने काम सुरू केले

२४ मार्चपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना चार मेस रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने १४० किलोमीटर अंतरावर खासगी गुंडांना आर्थिक मोबदला देऊन व दहशत निर्माण करून रस्त्याचे काम सुरू केल्याचा आरोप करत संघर्ष समितीने प्रशासनाने शेतकऱ्यांचा संयम तोडण्यासाठी असे पाऊल उचलले का? गुंड व शेतकरी यांच्यात दंगल पेटवायची आहे का, आदी प्रश्‍न उपस्थित केले. हा प्रकार अशोभनीय असल्याने त्याचा निषेध करत आहोत व यापुढे काही बरे-वाईट झाल्यास, नुकसानकारक घटना घडल्यास त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असेही संघर्ष समितीने निवेदनात म्हटले आहे.
 
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या
मागण्यांसाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अधिकारी व शेतकरी यांच्यात वाद झाला. नंतर या शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. संघर्ष समितीचे रमेश माळी, अनिल रायते, रामलाल परदेशी, प्रकाश परदेशी, प्रभाकर शिंदे, चंद्रकांत चौधरी, सोमनाथ भोई, शेवंता परदेशी, बाळू सोनवणे, भिका माळी, भूपेंद्र नाईक, दिनकर सूर्यवंशी, मनोहर पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचा यात सहभाग होता.

Web Title: farmer agitation to collector office