कर्जासाठी जिल्हा बॅंकेत शेतकऱ्यांचा ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

नाशिक - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून कर्ज मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील विविध कार्यकारी विकास सेवा संस्था संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी आज जिल्हा बॅंकेत ठिय्या आंदोलन केले. दोन दिवसांत निर्णय न झाल्यास बॅंकेला कुलूप लावू, असा इशारा देण्यात आला. यापुढे शेतीच्या कर्जाअभावी शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यास त्यास बॅंकेच्या अध्यक्षांना कारणीभूत धरू, असा असा इशारा संघटनेने दिला.

गेल्या चार एप्रिलला जिल्हा बॅंकेने परिपत्रक काढून 31 मार्चपूर्वी सोसायटीतर्फे कर्ज भरल्यास त्वरित कर्जपुरवठा केला जाईल, असे कळविले होते. कर्ज भरल्यानंतर नवीन कर्ज देणार असल्याने सोसायटी संचालकांनी काही गावांत ते भरून घेतले. आता जिल्हा बॅंक त्यांनाही कर्ज देत नसल्याने आज सोसायटी संघटनेने जिल्हा बॅंकेत ठिय्या आंदोलन करून अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना धारेवर धरले. बॅंकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे येईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होते. ते आल्यानंतर आक्रमकपणे पीक कर्जाची मागणी केली.

खाती गोठवली नाहीत
'जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कोणत्याही शेतकऱ्याचे खाते गोठवलेले नाही. 31 मार्चला वर्षअखेरनिमित्ताने व सहकार आयुक्तांच्या पत्रावरून काही खात्यांचे व्यवहार नूतनीकरणासाठी तूर्त थांबवले होते,'' असे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी स्पष्ट केले. सद्यःपरिस्थितीत नवीन पीक कर्ज देण्यासारखी आर्थिक परिस्थिती नाही. कर्जमाफीचा निर्णय तातडीने घेतल्यास यातून मार्ग निघू शकतो. तोपर्यंत राज्य सहकारी बॅंकेने अथवा सरकारने तीनशे कोटी रुपये जिल्हा बॅंकेला "सॉफ्ट लोन' स्वरूपात द्यावेत, असेही ते म्हणाले.

Web Title: farmer agitation in district bank for loan