आजारी शेतकरी इस्त्राईलमध्ये अडकला 

आजारी शेतकरी इस्त्राईलमध्ये अडकला 

नाशिक - कृषी विभागाच्या इस्त्राईल अभ्यास दौऱ्यासाठी गेल्यावर जेरुसलेममध्ये हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने खंडाळा (जि. अकोला) येथील शेतकरी गजानन वानखेडे (वय 36) यांच्यावर शेरी झेडेक मेडिकल सेंटरमध्ये अँजिओप्लॅस्टी करण्यात आली. वैद्यकीय उपचारांसाठी परवानगी दिल्यावर तांत्रिक कारणास्तव खर्चाचा परतावा देण्यास रेलिगेयर आरोग्य विमा कंपनीने हात वर केले. त्यामुळे उपचारानंतर वैद्यकीय बिलासाठी वानखेडे यांना जेरुसलेममधील हॉटेलमध्ये अडकून पडावे लागले. 

अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या 56 शेतकऱ्यांपैकी वानखेडे यांच्या छातीत विमान प्रवासादरम्यान दुखू लागले. जेरुसलेम विमानतळावरुन हॉटेलमध्ये पोचल्यावर मध्यरात्री त्यांच्या छातीत पुन्हा दुखू लागल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सार्वजनिक सुटीमुळे अँजिओग्राफी करण्यासाठी एक दिवसाची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर अँजिओप्लॅस्टी करण्याचा सल्ला देण्यात आला. दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या पुण्याच्या लाईफ लाईन टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन विम्यासंबंधीची माहिती सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी घेतली. त्यावेळी 37 लाखांचा वैद्यकीय खर्च मिळू शकतो म्हटल्यावर अँजिओप्लॅस्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधीची माहिती पुण्याच्या कृषी आयुक्तालयाला कळविली होती. 

मधुमेहाचे कारण केले पुढे 
अँजिओप्लॅस्टीचा खर्च साडेबारा लाखांपर्यंत पोचला. हा खर्च परत मिळावा म्हणून विमा कंपनीला बिले पाठवण्यात आली. अभ्यास दौऱ्याला सुरवात होण्यापूर्वी आजाराबद्दलची माहिती शेतकऱ्यांकडून घेण्यात आली नव्हती. पण वैद्यकीय उपचारावेळी मधुमेहाचा मुद्दा पुढे आला आणि विमा कंपनीने नेमक्‍या याच मुद्यावर बोट ठेवत मधुमेह घोषित केला नाही असे स्पष्ट करत वैद्यकीय खर्च नाकारला. 22 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अभ्यास दौऱ्यातंर्गत मंगळवारी (ता.26) विमा कंपनीने मेल पाठवून खर्चाचा परतावा मिळणार नाही, असे स्पष्ट केले. अशातच वानखेडे यांच्या व्हिसाची मुदत बुधवारी (ता.27) संपत असल्याने 3 मार्चपर्यंत व्हिसा मुदत वाढवून घेण्यात आली. प्रवासी कंपनीने रुग्णालयातून पुन्हा वानखेडे यांना हॉटेलमध्ये निवास आणि भोजनाची व्यवस्था केली. अभ्यास दौरा आज संपल्याने अन्य शेतकरी भारतात परतले. वानखेडे यांच्यासमवेत लक्ष्मीकांत कौटकर (रा. आडगाव, जि. अकोला) हे थांबले आहेत. 

आता पुढे काय? 
अभ्यास दौऱ्यावरुन परतल्यावर शेतकऱ्यांसमवेत असलेले डॉ. नितीन लोखंडे (रा. अकोट) यांनी आज पुण्यातील कृषी आयुक्तालय गाठले. तोपर्यंत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल कळवण्यात आले होते. त्यानुसार अहिर यांच्या कार्यालयातून कृषी आयुक्तालयाला तत्काळ मदत करण्याची सूचना दिली. आता कृषी विभागाने पैसे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यासाठी मंत्रालयाची परवानगी मागितली आहे. जेरुसलेममधील सार्वजनिक सुटी आणि 3 मार्चपर्यंत असलेल्या "व्हिसा'ची मुदत लक्षात घेता, यंत्रणा किती वेगाने निर्णय घेणार यावर वानखेडे आणि कौटकर यांचा मायदेशी येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

अधिकारी नामानिराळे 
इस्त्राईल अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसमवेत कृषी विभागाचे अधिकारीही होते. पण अभ्यास दौरा संपल्यावर इतर शेतकऱ्यांसमवेत मायदेशी परतणे धन्य मानले आहे. अशा पद्धतीने नामानिराळे झालेल्या अधिकाऱ्यांमुळे कृषी विभागाच्या कारभराविषयी नाराजी व्यक्त होत आहे. 

""शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा दोन वर्षांपासून बंद पडला होता. आता अभ्यास दौऱ्याला सुरवात झाल्यावर दोन वर्षापूर्वी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांमधून सोडत पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. पहिल्याच दौऱ्यात गंभीर प्रश्‍नाला सामोरे जावे लागले असल्याने यापुढील काळात इस्त्राइल दौऱ्यावर जाणाऱ्या 800 शेतकऱ्यांची खबरदारी काय घेतली जाणार? हे महत्वाचे आहे.'' 
- डॉ. नितीन लोखंडे 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com