पंचनामे पूर्ण; आता प्रतीक्षा मदतीची 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

साक्री ः तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांसह फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात तालुक्‍यातील सुमारे 81 हजार 660 शेतकऱ्यांचे एक लाख 306 हेक्‍टरवरील क्षेत्राचे पूर्णतः नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्यांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येत असून, या नुकसानीची मदत कधी मिळते याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

साक्री ः तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांसह फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात तालुक्‍यातील सुमारे 81 हजार 660 शेतकऱ्यांचे एक लाख 306 हेक्‍टरवरील क्षेत्राचे पूर्णतः नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्यांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येत असून, या नुकसानीची मदत कधी मिळते याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 
राज्यात परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीचा फटका साक्री तालुक्‍यातही मोठ्या प्रमाणात बसला. तालुक्‍याच्या सर्वच भागांतील खरीप पिकांसह फळबागांचे पूर्णतः नुकसान झाले. अनेक पिके शेतातच सडली. ज्वारी, बाजरी, मका आदी उभ्या पिकांच्या कणसांनाच कोंब फुटले. कपाशीची बोंडे सडली. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम काही दिवसांपासून सुरू होते. यात जिरायती, बागायती पिकाखालील क्षेत्र व फळपिके अशा तीन वर्गवारीत हे पंचनामे करण्यात आले. यात तालुक्‍यातील सुमारे 81 हजार 660 शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले. एकूण लागवडीच्या एक लाख सात हजार 61 हेक्‍टर क्षेत्रापैकी सुमारे एक लाख 306 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचे पंचनाम्यांमधून निष्पन्न झाले. 
प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार तालुक्‍यातील जिरायती पिकाखालील क्षेत्रात सुमारे 62 हजार 974 शेतकऱ्यांचे 73 हजार 993 हेक्‍टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. यात कपाशीचे 1413 हेक्‍टर, मका 28 हजार 861, बाजरी 22 हजार 978, सोयाबीनचे 10 हजार 890, नागली 2256, भात 1450, ज्वारी 41, भुईमूग 5300 व अन्य 804 असे एकूण 73 हजार 993 हेक्‍टर क्षेत्राला फटका बसला आहे. बागायती क्षेत्रातील सुमारे 18 हजार 200 शेतकऱ्यांचे 25 हजार 216 हेक्‍टर क्षेत्र पूर्णपणे बाधित झाले आहे. यात कांद्याचे 6521, कपाशीचे 12 हजार 239 यासह अन्य पिकांचे सुमारे 25 हजार 216 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. फळ पिकांखालील सुमारे 486 शेतकऱ्यांचे 1097 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. या सर्वांचा एकत्रित अहवाल प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर पाठविला असून, यानंतर पुढील कार्यवाही होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

आता प्रतीक्षा मदतीची 
दरम्यान, अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील सर्वच पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत कुठल्याही प्रकारचे उत्पादन हाती न आल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अशा वेळी सरकारने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. आता नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले. लोकप्रतिनिधी/अधिकाऱ्यांचे पाहणी दौरेही आटोपले आहेत. अशा वेळी आता तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer heavy rain panchana complite sakri