शेतकऱ्यांनी महामार्गावर ओतला भाजीपाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

इंदिरानगर (नाशिक) - वाशी (नवी मुंबई) येथील एपीएमसीतील लिलाव माथाडी कामगारांच्या संपामुळे बंद असल्याची माहिती व्यापारी अन्‌ यंत्रणेने न कळवल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला.

इंदिरानगर (नाशिक) - वाशी (नवी मुंबई) येथील एपीएमसीतील लिलाव माथाडी कामगारांच्या संपामुळे बंद असल्याची माहिती व्यापारी अन्‌ यंत्रणेने न कळवल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला.

विक्रीसाठी तोडलेला सात ट्रकमधील 50 हजार किलो भाजीपाला आज दुपारी येथील गरवारे पॉइंटजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर ओतला. सरकारचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी महामार्गावर तासभर ठिय्या दिल्याने वाहतूक खोळंबली होती.

महामार्गावर वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या. अंबड पोलिसांनी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तासाभरानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. अंबड पोलिसांनी रास्ता-रोको करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

माथाडी कामगारांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून (ता. 27) बंद पुकारलेला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कोबी, फ्लॉवर, वांगे, वाल आदी विक्रीसाठी तोडून ठेवले. नेहमीप्रमाणे शेतकरी भाजीपाला वाशी "मार्केट'मध्ये घेऊन गेले. पण, त्या वेळी त्यांना लिलाव बंद असल्याचे दिसले. लिलाव न झाल्याने गणेशगाव (त्र्यंबकेश्‍वर), शिवणगाव, गणेशगाव (नाशिक) ओझरखेड, राजेवाडी, पिंपळगाव, गंगाम्हाळुंगे, देवरगाव, शेरपाडा, रोहिले आदीसह परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

व्यापाऱ्यांनी माथाडी कामगारांच्या संपाबाबतची कोणतीही माहिती न दिल्याने भाजीपाल्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीला व्यापारी जबाबदार आहेत. सरकारने हे नुकसान भरून द्यायला हवे.
- तुषार डहाळे, सरपंच, गणेशगाव

निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देत काबाडकष्ट करून उत्पादित केलेला भाजीपाला रस्त्यावर फेकताना वेदना झाल्या. आता तरी सरकारने आणि यंत्रणेने शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात घ्यायला हवा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी.
- दीपक वाघ, शेतकरी आंदोलक

Web Title: Farmer Highway vegetable Strike