शेतकऱ्यांच्या उत्‍पन्न वाढीसाठी ‘तिची’ धडपड !

शेतकऱ्यांच्या उत्‍पन्न वाढीसाठी ‘तिची’ धडपड !
नंदुरबार : लहानपणी वडिलांना कष्ट करताना तिने पाहिलेले, कष्ट करूनही पदरात फारसे येत नव्हते, तेव्हा केलेला निश्चय तिने अजूनही कायम ठेवला आहे. चितवी येथील कृषी सहायक ऊर्मिला गावित कष्टकरी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे म्हणून आजही त्याच निश्चयाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीत आहेत. 

आवश्यक वाचा- धुळे सायकलिस्टच्या १२ सायकलस्वारांनी सहाशे किमी अंतर कापले ४० तासांत  

ऊर्मिला यांच्याकडे वागदी आणि देवलीपाडा गावची जबाबदारी आहे. शिक्षण कृषी पदविका बारावीपर्यंत झाले असूनही त्यांनी ज्ञानार्जन सोडले नाही. शेतीविषयक पुस्तके, मासिके आवर्जून वाचत त्या शेतीतील बदलांविषयी जाणून घेतात. नव्या गोष्टींचे प्रशिक्षण घेणेही त्यांना आवडते. म्हणूनच त्यांना शेतकऱ्यांना नव्या तंत्राची माहिती सोप्या पद्धतीने देता येते. सकाळी साडेआठला त्या घरातील कामे आटोपून बाहेर पडतात. दिवसभर तिन्ही गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. तालुका कार्यालयालाही काही वेळ भेट असते. शेतकऱ्यांशी संवाद साधणे, त्यांच्या शेतात जाऊन पिकांविषयी माहिती देणे, हा त्यांचा दिनक्रम असतो. 

ऊर्मिला जेव्हा २०१८ ला गावात चितवी गावात रुजू झाल्या तेव्हा बागायत क्षेत्र ५५ हेक्टर होते. आता ते ८५ हेक्टरपर्यंत पोचले आहे. शेतकरी पारंपरिक शेती सोडून नव्या तंत्राचा वापर करू लागले आहेत. निंबोळी अर्क तयार करणे, गावराण पद्धतीने दशपर्णी तयार करण्याची प्रात्यक्षिके घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविले आहे. हवामानानुसार पीक घेण्याची सवय त्यांनी शेतकऱ्यांना लावली. कृषी विद्यापीठाच्या मदतीने अधिक उत्पन्न देणारे बियाणे शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि पेरणी यंत्राचा लाभ दिला. शेडनेट, भाजीपाला उत्पादनात मल्चिंग पेपरचा उपयोग, उसाची पट्टा पद्धतीने लागवड, आंतरपीक आले आदींबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

आवर्जून वाचा- भारतातील रहस्यमय असा..हाडांचा सांगाड्यांचा रुपकुंड तलाव; संशोधनातून या गोष्टी आल्या समोर

‘विकेल ते पिकेल’ योजनेअंतर्गत इंद्रायणी तांदळाच्या उत्पादनाला चालना देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यासाठी वर्षातून १० शेतीशाळांचे आयोजन करतात. हरभरासाठी १० शेतीशाळा घेतल्या. कृषी विभागामार्फत हरभऱ्याचे मोफत बियाणेदेखील शेतकऱ्यांना दिले आहे. अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे वळविण्याचे कामही त्या करीत आहेत. या भागातील शेतकरी संपन्न व्हावा आणि त्याने नवे तंत्र स्वीकारावे या दिशेने त्या करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. 

महिला म्हणून कधीही अडचण आली नाही. ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळते. येत्या काळात मल्चिंग पेपरचा उपयोग आणि सूक्ष्म सिंचनाकडे शेतकऱ्यांना वळवायचे आहे. शेतात चांगले पीक पाहून होणारा आनंद मिळत असल्याने कष्ट वाटत नाही. 
- ऊर्मिला गावित 

ऊर्मिला गावित यांनी शेतीशाळा उपक्रम उत्तमरितीने राबविला आहे. त्यामुळे गावातील शेतकरी नव्या तंत्राकडे वळत आहेत. हळद आणि मसाला पिकांच्या वाढीसाठीही त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. 
- बापू गावित, तालुका कृषी अधिकारी, नवापूर  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com