कंधाणे येथील शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

कंधाणे - येथील रवींद्र भावराव बिरारी या तरुण शेतकऱ्याने 17 क्विंटल कांदा विकून हातात अवघे 370 रुपये उरल्याने त्यातील 60 रुपये टपाल खर्चासाठी काढून उर्वरित 310 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनिऑर्डरद्वारे पाठविले आहेत.

कंधाणे - येथील रवींद्र भावराव बिरारी या तरुण शेतकऱ्याने 17 क्विंटल कांदा विकून हातात अवघे 370 रुपये उरल्याने त्यातील 60 रुपये टपाल खर्चासाठी काढून उर्वरित 310 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनिऑर्डरद्वारे पाठविले आहेत.

शासनाने शेतकऱ्यांकडे सपशेल पाठ फिरविली असून, कांद्यामुळे उद्‌भवलेल्या संकटांची प्रचिती शासनाला यावी, यासाठी आपण ही मनिऑर्डर पाठविली असल्याचे बिरारी यांनी सांगितले. बागलाण तालुक्‍यात सध्या गेल्या वर्षी काढलेला उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत पडून आहे. तब्बल वर्षभर प्रतीक्षा करूनही समाधानकारक भाव न मिळाल्याने ही स्थिती असतानाच, दुसरीकडे नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे सरासरी एक ते दीड रुपये किलो, या दराने कांदा खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. बिरारी यांनी बुधवारी (ता. 12) येथील बाजार समितीत नवीन लाल कांदा विक्रीसाठी आणला होता. एक दिवस आधी त्याच कांद्याला 485 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. मात्र, दुसऱ्या दिवशी केवळ 150 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बुधवारी शहरात कांदा रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. गुरुवारी बिरारी यांनी 17 क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला. त्यापोटी त्यांना दोन हजार 370 रुपये मिळाले.

त्यातील दोन हजार रुपये ट्रॅक्‍टर भाडे अदा करून उरलेल्या 370 रुपयांतून 60 रुपये टपालखर्च काढून उर्वरित 310 रुपये त्यांनी मनिऑर्डरने मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविले आहेत. सटाणा येथील टपाल कार्यालयातून त्यांनी ही मनिऑर्डर पाठविली. गेल्या वर्षीचा दहा ट्रॉली कांदा चाळीत शिल्लक असून, नवीन दहा एकर लाल कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने आपले कुटुंब आर्थिक गर्तेत सापडल्याचेही बिरारी यांनी सांगितले.

यंदा आमच्या भागावर निसर्गाने वक्रदृष्टी केली आहे. कमी पर्जन्यमानामुळे खरीप हातून गेलाच आहे. थोड्या पाण्यावर कांद्याचे पीक घेतले; मात्र तेही मातीमोल भावाने विकले गेले. त्यामुळे निसर्गाने मारले अन्‌ सरकारने वाऱ्यावर सोडले, अशी गत झाली आहे.
- रवींद्र बिरारी, शेतकरी, कंधाणे

Web Title: Farmer Moneyorder to Chief Minister