शेतकरी संघटनेची संपूर्ण कर्जमाफीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

धुळे - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे आज सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळी स्थिती उद्‌भवली असून, खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांची पैसेवारी 50 च्या आत आहे. यातच हाती आलेल्या शेतमालाचे दरही कोसळल्याने शेतकऱ्यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. कांदा, तूर व कापसाचे दरही गडगडल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असून, सातत्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. यामुळे हे दुष्टचक्र संपविण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा, कांदा व तुरीची निर्यात सुरळीत करावी, कापसाला किमान सहा हजार रुपये भाव द्यावा. कापसाचे अनुदान पुन्हा सुरू करावे.

आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंह रघुवंशी, माजी अध्यक्ष आत्माराम पाटील, संघटक शांतूभाई पटेल, शशिकांत भदाणे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: farmer organisation full loaan waiver demand