भाजपच्या जाहीरनाम्याची शेतकरी संघटनेकडून होळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

नाशिक - राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांदा, डाळिंब आणि अन्य शेतमालाला मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना झुलवत ठेवणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या धोरणांची व त्यांच्या जाहीरनाम्याची आज शेतकरी संघटनेने होळी करत निषेध व्यक्त केला. या वेळी येत्या मेपासून संघटना प्रखर आंदोलन सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील, रामनाथ ढिकले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. कांदा, ऊस आणि अन्य पिकांना उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव द्या, सरसकट कर्जमुक्ती, वीजबिलमुक्ती करा, बंद पडलेले साखर कारखाने पूर्ववत सुरू करा, शरद जोशींनी तयार केलेल्या अहवालाची अंमलबजावणी करा, शेतकरीविरोधी धोरणे बदला, तंत्रज्ञानाचे व विज्ञानाचे स्वातंत्र्य द्या आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

भाजपवर टीका करताना पाटील म्हणाले, 'जाहीरनाम्यात भाजपने दिलेली आश्‍वासने खोटी ठरली. एकही आश्‍वासन पूर्ण होत नाही. कांद्याचा उत्पादनखर्च एक हजार 800 रुपये प्रतिक्विंटल असताना भाव तीनशे ते सहाशे रुपये आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. साखर कारखान्यांचे कर्ज माफ करून त्यांना ऊर्जितावस्थेत आणणे गरजेचे आहे.''

Web Title: farmer organisation holi bjp declaration