अरे बापरे... पंचनाम्यासाठी मागितली लाच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

पाचोराः नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे नियुक्तीस असलेले तलाठी मिलिंद जयवंत बच्छाव व कोतवाल विलास उर्फ कैलास काशिनाथ धिवरे या दोघांना जळगावच्या लाचलुचपत पथकाने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसामुळे तक्रारदार शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठ्याने लाच मागितल्याने समाजमनातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. 

नगरदेवळा येथील २९ वर्षीय तक्रारदाराचा शेतीचा व्यवसाय असून, त्यांनी मका व कापूस पीक पेरले होते. परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतातील मका व कापूस पिकाचे पूर्णतः नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळावी, यासाठी शेतातील पंचनामा करण्याची विनवणी तक्रारदार शेतकऱ्याने तलाठी मिलिंद बच्छाव (वय ५५) यांच्याकडे केली. त्यावेळी शेतातील नुकसानीचा पंचनामा करून भरपाईबाबत कार्यवाहीसाठी तलाठी बच्छाव यांनी कोतवाल विलास उर्फ कैलास काशिनाथ धिवरे (वय ४५) यांच्यामार्फत तक्रारदाराकडे पाच हजारांची लाच मागितली. तेव्हा तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत विभागाचे सुनील कडासने व नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक जी. एम. ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोतवाल विलास धिवरे यांच्याकडे लाचेची ५ हजार रुपयांची रक्कम दिली व ती रक्कम त्यांनी तलाठी मिलिंद बच्छाव यांच्याकडे सोपवताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. लाचेची ५ हजाराची रक्कमही जप्त केली. पथकाने बच्छाव यांना त्यांच्या कजगाव येथील निवासस्थानी नेऊन चौकशी केली. याबाबत तलाठी आणि कोतवाल यांच्या विरोधात लाच प्रकरणी गुन्हा नोंदवून दोघांना ताब्यात घेतले आहे. 

शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना
अवकाळी पावसामुळे खरीप उत्पादनाचे प्रामुख्याने कापूस व मका या नगदी पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्येच्या विचारापर्यंत आला आहे. राज्यकर्त्यांनी नुकसानीचे पंचनामे करून भरपाईचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शंभर टक्के नुकसान झाल्याने पंचनामे होऊन भरपाई मिळावी या अपेक्षेत शेतकरी असताना जे नुकसान झाले त्याचा पंचनामा करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठी बच्छावच्या संदर्भात समाजमनातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer panchname talathi lach nagardevda