शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न - नीलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

लातूरच्या भूकंपात वैधव्य आलेल्या महिलांच्या पुनर्वसनाच्या धर्तीवर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांचे पुनर्वसन व्हायला पाहिजे. भूकंपग्रस्त विधवांप्रमाणेच त्यांना सोयी- सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. नाशिकला "कॉफी विथ सकाळ' उपक्रमात त्या बोलत होत्या.

नाशिक - लातूरच्या भूकंपात वैधव्य आलेल्या महिलांच्या पुनर्वसनाच्या धर्तीवर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महिलांचे पुनर्वसन व्हायला पाहिजे. भूकंपग्रस्त विधवांप्रमाणेच त्यांना सोयी- सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. नाशिकला "कॉफी विथ सकाळ' उपक्रमात त्या बोलत होत्या.

उपसभापती झाल्यानंतर प्रथमच नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या श्रीमती गोऱ्हे यांनी चांदवड येथील कुलदेवता श्री रेणुकामातेचे दर्शन घेतले. त्यानंतर सातपूर येथे "कॉफी विथ सकाळ' उपक्रमात संपादकीय सहकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या भगिनी झेलमताई जोशी, सतलज दिघे, नात इरावती याही उपस्थित होत्या. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी त्यांचे स्वागत केले.

शिवसैनिक हेच माझे शस्त्र
युवक क्रांती दलात 1984 पासून, तर 2000 पर्यंत कायम महिला हक्क रक्षणासह विविध सामाजिक चळवळीत सक्रिय राहिलेल्या श्रीमती गोऱ्हे यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून प्रश्‍नांची सोडवणूक करण्यापर्यंतची वाटचाल मांडली. राज्यात महिला संरक्षण समिती, आदिवासी विद्यार्थिनींवरील अत्याचारापासून तर अलीकडे ऊसतोड कामगार महिलांचे गर्भाशय पिशव्या काढण्यापर्यंतच्या विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीदरम्यान कणकवली ते रामटेक आणि जालना ते यवतमाळपर्यंत काम करावे लागते; मात्र त्यात मला कधी शस्त्रांची गरज भासली नाही. आमचे शिवसैनिक हेच आपले शस्त्र राहिले आहे.

समर्पक उत्तर मिळवणे हे कसोटीचे
विधिमंडळात नव्या सदस्यांना संधी मिळत नसल्याचे कायम बोलले जाते. त्याविषयी त्या म्हणाल्या, की विधिमंडळात प्रश्‍न मांडण्याचे प्रत्येक सदस्याला अप्रूप असते. मात्र, विधिमंडळात 30 ते 35 मिनिटे भाषणापेक्षा कमी वेळेत अगदी मोजक्‍या शब्दांत प्रश्‍न मांडणे ही खरी कसोटी असते. ते शिकणे हेही महत्त्वाचे असते. पण मला असे वाटते, की प्रश्‍न मांडण्यापेक्षा आपण मांडलेल्या प्रश्‍नांबाबत संबंधित मंत्र्यांकडून समर्पक पद्धतीचे उत्तर मिळविणे हे जास्त महत्त्वाचे असते, ते शिकता आले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Suicide Affected Family Women rehabilitation Neelam Gorhe