शेतकरी सात वर्षे विजेच्या प्रतीक्षेत

भाऊसाहेब गोसावी
गुरुवार, 19 जुलै 2018

निमोण- शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी २४ तास शेतीपंपासाठी वीजपुरवठा दिला जाईल, अशा घोषणा वेळोवेळी केल्या गेल्या. ‘महावितरण आपल्या दारी’ यासारखी योजनाही राबवली गेली. तरीदेखील २०१० पासून नाशिक जिल्ह्यात १८ हजार ४५२ शेतकरी शेतीपंपासाठी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या शेतकऱ्यांनी सात वर्षांपासून कंपनीकडे पाच ते सहा हजार रुपये अनामत भरलेली आहे. या शेतकऱ्यांचे असे कोट्यवधी रुपये महावितरण कंपनी वापरत आहे.

महावितरणने तीस हजार कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी नुकताच नियमित ग्राहकांच्या माथी अधिभार मारला. महावितरण तोट्यात असण्याच्या अनेक कारणांपैकी वीजचोरी व गळती हे प्रमुख कारण आहे. एका बाजूला वीजचोरी रोखण्याचे मोठे आव्हान महावितरण कंपनीसमोर आहे. दुसऱ्या बाजूला हजारो शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वास्तविक पाहता दर वर्षी हजारोंच्या संख्येने जिल्ह्यात नव्याने विहिरींचे खोदकाम होत असते. हजारो नवीन विंधनविहिरी, कूपनलिका होतात. यातील बहुतांश विहिरी, तसेच कूपनलिकेमध्ये शेतीला पाणी देण्यासाठी पंप बसविले जातात. अधिकृत वीजजोडणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना चोरून वीज वापरावी लागते. नाशिक जिल्ह्यातील नाशिक नागरी विभागात ४०८, नाशिक ग्रामीण विभागात सहा हजार ११८, तर मालेगाव विभागात ११ हजार ९२६ शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी ‘ए’ वन अर्ज व अनामत जमा केली आहे. मालेगावअंतर्गत मनमाड विभागात सर्वाधिक म्हणजे सहा हजार २३७ शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.

महावितरण कंपनीकडे मागणी केलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ वीजजोडणी दिली पाहिजे. यामुळे वीजगळती रोखली जाऊन कंपनीच्या उत्पन्नात वाढ होईल.
- शिरीषकुमार कोतवाल,  माजी आमदार, चांदवड

शेतीपंपासाठी वीजजोडणीची मागणी करून अनामत भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना १५ ऑगस्टनंतर टप्प्याटप्प्याने उच्चदाबाने वीजजोडणी दिली जाणार आहे.
- मनीष देवरे,  प्रभारी अधीक्षक अभियंता, नाशिक

Web Title: Farmer waiting for electricity for seven years