दहा किलो कापूस अन् दोन क्विंटल मक्यावरच दिवाळी

दहा किलो कापूस अन् दोन क्विंटल मक्यावरच दिवाळी

येवला - आनंदाचा, उत्सवाचा आणि प्रकाशाचा सण असलेला दिवस चार दिवसांवर येऊनही अजून घरात खरेदीचा पत्ता नाही. घराच्या कोपऱ्यात जीव लावून ठेवलेला दहा-पंधरा किलो कापूस अन् दोन-तीन क्विंटल मका यावरच दिवाळीची खरेदी अन् घरसंसार यांचे गणित जुळवण्याचे कसब दुस्काळ पिडित शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. आर्थिक विवंचनेतील शेतकऱ्यांसाठी सण यंदा अंधारलेला वाटत आहे.

यंदाचा खरीप शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरिल हास्य हरवणार ठरला आहे. कारण वरुणराजाच्या भरवशावर केलेली खरीपाची पेरणी पूर्ण वाया गेली असून रब्बीचा तर प्रश्नच मिटला आहे. पाण्याअभावी उभी पिके करपल्याने गुंतवलेले भांडवल तर गेलेच पण उत्पन्नावर पाणी फिरल्याने तेलही गेले अन तूपही.. अशी अवस्था झाली आहे. यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या बळीराजाला आता आगामी सात महिन्याची चिंता लागली आहे. त्यातही दरवर्षी धुमधडाक्यात साजरी होणारा प्रकाशपर्वाचा सण यंदा अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे.

दोन दिवसांवर दिवाळी येऊनही ग्रामीण भागात अजून ७० टक्क्यांवर शेतकऱ्यांनी किराणा साहित्य खरेदी केलेली नाही. नवे कपडे अन घराला रंगरंगोटीचा तर विषयच नाही. लेकी माहेरी येणार असल्याने त्यांच्या साडीचोळीसाठी चार पैसे उपलब्ध करण्याची कसरत आत्ताच सुरू आहे. खरं तर दरवर्षी दिवाळी सणाचा खर्च मका,लाल कांदा आणि कापूस यापैकी कोणत्या तरी पिकातून भागला जायचा. सुरुवातीला निघालेले थोडापार कापूस किंवा मका विकली तरी दिवाळीसाठी पंचवीस-तीस हजार रुपये सहज उपलब्ध व्हायचे. यंदा मात्र सर्व चक्र उलटे फिरले असून शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने कापूस, मका, सोयाबीन विकली तरी पंचवीस-तीस हजार रुपये मिळणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर घरात चार पाच क्विंटल मका, वीस-पंचवीस क्विंटल कापूस आणि चार पाच क्विंटल सोयाबीन निघाले आहे. त्यांचीही गुणवत्ता दुय्यम प्रतीची असल्याने एखादा व्यापाऱ्यांच्या हवाली हे पीक करायचे आणि मिळणाऱ्या चार रुपयांत दिवाळी साजरी करायची..! हे एकच वाक्य ऐकायला मिळाले. सर्वसाधारण व जिरायती शेती असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था तर याहून बिकट असल्याने फाटके तुटके कपडे अन् उसनवारीवर आणलेला फरार हीच त्यांच्यासाठी दिवाळी ठरणार आहे.

असे झाले पिकांचे नुकसान
*कापसाचे दर वर्षी एकरी ८ ते १२ क्विंटल उत्पन्न निघते,एका झाडाला साधारण ५० ते ९० पर्यंत बोंडे लागतात. यावर्षी १० ते २० बोंडे असून १ ते ३ क्विंटल उत्पन्न निघाले आहे. 
*मकाचे एकरी २५ ते ३२ क्विंटलपर्यंत दरवर्षी उत्पन्न हाती लागते. या वर्षी ३ ते ५ क्विंटल मका पिकला असून काही शेतकऱ्यांना तर फक्त चाराच हाती आला आहे.
 *लाल कांद्याचा पावसाच्या भरवशावर जुगार खेळत लागवड केली पण पाणीच नसल्याने शेतातच हा कांदा उभा करपला आहे.
 *पूर्व भागात सोयाबीन,उडीद,मुग,तुरी ही कडधान्य तर शेतकऱ्यांना पहायला मिळाली नाही कारण शेतातच या झाडांचा पालापाचोळा होऊन गेला.

"यंदा पाऊस नसल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले.जवळ असलेले चार पैसे भांडवलासाठी खर्च झाले असून पाण्याअभावी झालेला खर्च ही निघणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी कशी करावी हा मोठा प्रश्न डोळ्या समोर आहे. पुढील बिकट व दुष्काळी परिस्थितीला सामोरे कसे जावे याचीच चिंता लागून राहिली आहे." 
- बाळासाहेब जानराव, शेतकरी, अंदरसूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com