दुष्काळी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा कायम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

कळवण तालुक्‍यातील तीन महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना अद्याप हे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे राज्य शासनाने देऊ केलेली ही मदत तालुक्‍यासाठी मृगजळच ठरली आहे. 

कळवण - राज्यातील दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने 151 तालुके व 268 महसूल मंडळांतील दुष्काळबाधित शेतकऱ्यांना हेक्‍टरी अनुदान जाहीर केले. मात्र कळवण तालुक्‍यातील तीन महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना अद्याप हे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे राज्य शासनाने देऊ केलेली ही मदत तालुक्‍यासाठी मृगजळच ठरली आहे. 

तालुक्‍यात कळवण, नवी बेज आणि मोकभणगी या तीन महसूल मंडळांत कोरडवाहू पिकाखालील दोन हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या दोन हजार 771, सिंचनाखालील दोन हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या 126, बहुवार्षिक फळपिकाखालील दोन हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या 57 शेतकऱ्यांना, तर कोरडवाहू पिकाखालील दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या 16 हजार 41, सिंचनाखालील दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या 580, बहुवार्षिक फळपिकाखालील दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या 145 शेतकऱ्यांना अनुदानाची मागणी महसूल विभागाने राज्य शासनाकडे केली आहे. 

अनुदान त्वरित वर्ग करा 
अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी अनुदान मिळालेले नसून शासनाने या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान तत्काळ वर्ग करून दुष्काळाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. 
-नितीन पवार, जिल्हा परिषद सदस्य 

"शासनाने गतिमानता दाखवावी' 
दुष्काळी महसूल मंडळात शासनाने कुठल्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत आधीच तुटपुंजी आहे. मदत जाहीर करून अनेक महिने लोटले तरी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना या मदतीची प्रतीक्षाच करावी लागत असल्याने शासनाने गतिमानता दाखवून त्वरित अनुदान द्यावे. 
-महेंद्र हिरे, तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are waiting for subsidies