शेतकऱ्यांच्या बांधावर उभ्या राहिल्या वर्षभरात अडीचशे कांदाचाळी

Onions
Onions

येवला - लाल कांद्याच्या आगारात आता पाणी नसतांनाही आता उन्हाळ कांद्याचे पिक शेतकऱ्यांचे लाडके होत आहेत. त्यातच चाळीत साठवलेला कांदा चांगले दाम देत असल्याने येवलेकर शेततळ्यासह वाट्टेल ते प्रयोग करत कांद्याचे पिक घेत आहेत. याचमुळे कांदा साठवण्यासाठी शासकीय योजनेतून शेतकरी भरभरून प्रतिसाद देत चाळी बांधत आहेत. गेल्या वर्षभरात येथे विक्रमी २५० वर चाळी बांधल्या आहेत. विशेष म्हणजे प्रतिसाद नसलेल्या तालुक्यांतील अनुदानाचा लाभ येथे दिला आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कांदा साठविण्यासाठी कांदाचाळींची योजना राबविली जाते. विशेषत जिल्ह्यासाठी कांदाचाळी मोलाची भूमिका बजावत शेतकऱ्यांना अधिक चार पैसे मिळवून देत आहेत. २०१६-१७ मध्ये तालुक्यात चाळीसाठी ५५४ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. तर उद्दिष्ट मात्र १०३ एवढे असताना कृषी विभागाने १०९ शेतकऱ्यांना लाभ दिलेला आहे.मात्र,उन्हाळ कांद्याला वाढती मागणी आणि भावातील तेजीने जून-जुलैत दमदार भाव मिळत असल्याने आता उन्हाळ कांदे चाळीत साठवण्याला प्राधान्य दिले जात आहे. दुष्काळी माळरानावर याचमुळे आता कांदे मुख्य पिक बनले आहेत.  

कांद्याचे आगार असलेल्या तालुक्यात मागील वर्षी तब्बल २ हजार ९०० शेतकऱ्यांनी कांदा चाळीसाठी अर्ज केले होते. मात्र,कृषी विभागाने १०८ शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. लॉट पद्धतीने लाभार्थी निवडले गेल्यावर अनेकजण प्रतिक्षेत असल्याने व जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत मंजूर उद्दिष्ट्याला मागणी नसल्याने तिकडील कोटा येवल्याला वर्ग करण्यात आला.यामुळे अजून १०० शेतकरी चाळी बांधू शकले आहेत. तसेच २०१८-१९ मधील अनुदानातून ६१ शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाल्याने त्यांनी देखील चाळी उभ्या केल्याने वर्षातच तब्बल २७० चाळी दुष्काळी तालुक्यात उभ्या राहिल्या आहेत.  

चाळीचे उद्दिष्ट वाढवा..!
कृषी विभाग समान प्रमाणात जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून देते.पण अनेक तालुक्यात तर नगण्य मागणी असते.हा विचार करून कांदा उत्पादक तालुक्यांना मागणीनुसार चाळी बांधकामाचे उद्दिष्ट मंजूर करावे. तसेच अनुसूचित जाती व जमातीचे लाभार्थ्यांचा प्रतिसाद अल्प असल्याने त्यांचे अनुदान माघारी पाठवले जाते.मात्र राखीवची मागणी नसेल ते अनुदान इतरांना देण्यासह अधिक कांदा पिकवला जात असलेल्या तालुक्याला लाभार्थी उदिष्ट वाढवून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. 

“तालुक्यात कांदा चाळींना अधिक मागणी आहे.त्यामुळे मंजुरीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना इतरत्रचे अनुदानाचा लाभ देऊन चाळी करण्यास चालना दिली आहे.गत वर्षातील सर्व २०८ चाळींचे अनुदानही वर्ग झाले आहेत तर ६१ शेतकऱ्यांना चालू वर्षातील अनुदानातून पैसे दिले जाणर आहे.तसेच यंदा लाभ देण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ३० तारखेपर्यत मुदत आहे.लाभार्थ्यांनी अर्ज भरणे अनिवार्य आहे.”
अभय फलके,तालुका कृषी अधिकारी,येवला

आकडे बोलतात...
२०१६-१७ मधील कांदाचाळी - १०६
-२०१७-१८ मधील कांदाचाळी - २०८
-२०१६-१७ मधील वाटप अनुदान ८९ लाख  
-२०१७-१८ मधील वाटप अनुदान - १ कोटी ७७ लाख
-दोन वर्षात वाढलेली कांदा साठवण क्षमता - ७६०० मे.टन
-प्रति टनाला मिळनारे अनुदान -३५०० रुपये
-शेतकऱ्यांना मिळणारे एकूण अनुदान - ८७,५००
-यावर्षी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत - ३० जून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com