व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

शेतकऱ्यांनी धनादेश व जमा पावत्यांवर विश्‍वास ठेवत आपला कांदा ब्राह्मणपाडे येथील खळ्यात आणून दिला. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी आपले धनादेश बॅंकेत जमा केले त्या प्रत्येक शेतकऱ्याचा धनादेश बाउन्स झाल्याने शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले

नामपूर - कांद्याची शिवार खरेदी करून मोसम खोऱ्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे अडीच कोटी रुपयांहून अधिक रकमेचे धनादेश आणि जमा पावत्या देऊन परप्रांतीय व्यापारी फरारी झाले आहे. दरम्यान, जिल्हा पोलिसप्रमुखांच्या परवानगीनंतर पोलिसपथक गुजरातमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे जायखेडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीराम कोळी यांनी सांगितले. फसवणूक झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी जायखेडा पोलिस ठाणे गाठून अनिल वल्लभ वसोया (गांधीनगर, गुजरात), अभिमन निंबा पगार (मूळगाव उत्राणे; ह. मु. पुणे) यांच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

तीन महिन्यांपूर्वी अनिल वल्लभ वसोया व अभिमन पगार यांनी ब्राह्मणपाडे (ता. बागलाण) येथील शेतकरी रमेश सीताराम बोरसे यांच्याकडून कांदा खरेदीसाठी भाड्याने जागा घेतली होती. सुरवातीच्या काळात या कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कांदा थेट शेतात खरेदी करून रोखीने पेमेंट केले. शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा या कांदा व्यापाऱ्याकडून 80 ते 100 रुपये प्रतिक्विंटल जास्त भाव मिळत असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी आपला कांदा या व्यापाऱ्याला विकला. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून या व्यापाऱ्याने चलनटंचाईचे कारण देत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रोख रकमेऐवजी सटाणा मर्चंट बॅंकेच्या नामपूर शाखेचे पटेल एक्‍स्पोर्ट कॉर्पोरेशन या करंट खात्याचे पुढील तारखेचे धनादेश दिले. काही शेतकऱ्यांना पटेल एक्‍स्पोर्ट कॉर्पोरेशन या नावाच्या पुढील तारखेच्या जमा पावत्या दिल्या. शेतकऱ्यांनी धनादेश व जमा पावत्यांवर विश्‍वास ठेवत आपला कांदा ब्राह्मणपाडे येथील खळ्यात आणून दिला. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी आपले धनादेश बॅंकेत जमा केले त्या प्रत्येक शेतकऱ्याचा धनादेश बाउन्स झाल्याने शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

शेतकऱ्यांनी ब्राह्मणपाडे येथील व्यापाऱ्याच्या खळ्यात येऊन चौकशी केली असता व्यापारी फरारी झाल्याचे समजले. फसवणूक झालेल्या दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी जायखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. बाळासाहेब कापडणीस (द्याने) यांचे दोन लाख 59 हजार 300 रुपये, दादाजी पगार एक लाख दहा हजार, अभिमन चव्हाण 39 हजार, अनिल बोरसे 71 हजार 686, विजय चव्हाण 53 हजार 700, नानाजी पगार 80 हजार, संजय चव्हाण 61 हजार, इम्रान सय्यद एक लाख 14 हजार, निवृत्ती बच्छाव 22 हजार, सोपान बोरसे 23 हजार 800, संजय खैरनार 65 हजार, हासीम शेख दोन लाख 29 हजार, शंकर बोरसे 34 हजार 782, गोरख बोरसे 65 हजार 109, विजय भामरे एक लाख 61 हजार, अभिमन गांगुर्डे 28 हजार 650, समाधान गांगुर्डे 31 हजार 800, योगेश चव्हाण 74 हजार 500, योगेश देवरे 97 हजार 410, उमेश सोनवणे 76 हजार 800, केशव जाधव 20 हजार, मधुकर अहिरे एक लाख दोन हजार 700, दीपक पाटील 93 हजार 762, शांताराम पवार 24 हजार, दीपक बोरसे 19 हजार 500, अजित बोरसे 31 हजार 66, विठ्ठल चव्हाण 27 हजार 750, संतोष बोरसे 18 हजार 550, रामदास बच्छाव 16 हजार, नितीन बोरसे सहा हजार, गणपत चव्हाण 17 हजार 550, माणिक बोरसे एक लाख 75 हजार, सतीश खैरनार 28 हजार, दगा बच्छाव तीन लाख 21 हजार, महेश पवार 16 हजार 200, दयाराम अहिरे एक लाख 50 हजार, सुनील अहिरे दोन लाख 45 हजार, शिवमन भामरे 35 हजार, नानाजी पगार एक लाख, एस. के. खैरनार एक लाख 50 हजार, संजय बोरसे एक लाख 62 हजार, प्रदीप पवार एक लाख, महेंद्र भामरे एक लाख 18 हजार, केदा भामरे 37 हजार 114, भिका चव्हाण 80 हजार, दयाराम नाईक 17 हजार, श्रावण पवार 18 हजार, रमेश बोरसे 68 हजार 587, जिभाऊ देवरे 18 हजार, राजेंद्र कापडणीस 69 हजार, हिंमत सोनवणे 55 हजार, प्रभाकर कापडणीस एक लाख 50 हजार, रमेश सोनवणे 70 हजार, रवींद्र सावंत 40 हजार यांनी जायखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अशीच फसवणूक झालेले हजाराहून अधिक शेतकरी असून, त्यांना अद्याप आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलेले नाही. ज्या शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला आपला कांदा विकून धनादेश अथवा जमा पावत्या घेतल्या असतील त्यांनी जायखेडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन जायखेडा पोलिसांनी केले आहे.

मजुरांचेही चार लाख बुडाले
या व्यापाऱ्याच्या कांद्याच्या खळ्यावर शंभराहून अधिक मजूर होते. या मजुरांचे मुकादम माणिक बोरसे, अरुण बोरसे, बबन बोरसे आणि प्रमोद बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यापाऱ्याने उन्हातान्हात मोलमजुरी करणाऱ्या मजुरांचे चार लाख थकविले आहेत.

कांदा बारदान व्यापाऱ्याचेही दोन लाख
जायखेडा येथील कांदा बारदान व्यापारी किरण ब्राह्मणकर यांच्याकडून या कांदा व्यापाऱ्याने पाच लाख रुपयांचे बारदान घेतले. मात्र, त्यातील दोन लाख रुपयांची उधारी होती. ती त्यांना मिळालेली नसून तेदेखील तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात हजर होते.

Web Title: farmers cheated by traders