शेतकरी ग्राहकाअभावी थंडावला पाईप उद्योग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

केंद्र सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयाचा फटका; उत्पादन ५० टक्‍क्‍यांवर

केंद्र सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयाचा फटका; उत्पादन ५० टक्‍क्‍यांवर

जळगाव - शेतीशी निगडित असलेला उद्योग म्हणजे पाइप इंडस्ट्रीज अर्थात पाईप उद्योग. केंद्र सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर सर्वांसमोर पैशांची समस्या निर्माण झाली आहे. त्यानुसारच ज्यांचे व्यवहार जास्तीत जास्त ‘कॅश’ स्वरूपात होतात अशा शेतकरी ग्राहकाकडूनच मागणी थांबल्याने पाईप उद्योग थंडावला आहे. नोटा बंदीनंतर गेल्या दीड महिन्यात उत्पादनावर ५० ते ६० टक्‍के परिणाम जाणवला आहे. कामगारांना ‘कॅश’ स्वरूपात पैसे देणे शक्‍य होत नसल्याने कामगारांअभावी अनेकदा मशिनरी बंद ठेवण्याची वेळ उद्योजकांवर आल्याचे ‘पाइप इंडस्ट्रीज’मधील उद्योजकांकडून सांगण्यात आले.

व्यवसायावर ५० टक्‍के परिणाम
रवींद्र लढ्ढा (अध्यक्ष, पाइप मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशन) - संपूर्ण ‘पाइप इंडस्ट्रीज’ शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांकडूनच मागणी होत नसेल, तर उद्योगावरील परिणाम जाणवतो. हीच परिस्थिती गेल्या दीड महिन्यात नोटा बंदीच्या निर्णयानंतर अनुभवायला मिळाली. शेतकऱ्यांकडे रोख पैसा नसल्याने पाईप खरेदी केली जात नव्हती. यामुळे साधारण ५० टक्‍के परिणाम उत्पादनावर झाला आहे. तसेच शनिवारी बॅंका बंद राहत असल्याने कर्मचाऱ्यांना धनादेश (चेक) स्वरूपात पगार देणे शक्‍य होत नसल्याचीही एक अडचण आहे.

पूर्णपणे ‘सेल’ थांबला
श्रीराम पाटील (संचालक, श्री साईराम प्लास्टिक ॲण्ड इरिगेशन) - नोटा बंदीनंतर सर्वच उद्योगांवर झालेल्या परिणामाप्रमाणे पाईप उद्योगावरही परिणाम झाला आहे. नोटा बंदी झाल्यानंतर दीड महिन्यात पाईपचा सेल पूर्णपणे थांबला आहे. साधारण ७० टक्‍क्‍यांपर्यंत परिणाम झाला आहे.

कंपनीत येणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार बॅंक खात्यात करू शकत नाही. काहींचे पगार ‘कॅश’नेच करावे लागतात. परंतु पैशांचा तुटवडा जाणवत असल्याने कामगार येत नाही. परिणामी, मशिनरी बंद ठेवण्याची वेळ येते. ‘कॅशलेस’ ही संकल्पना चांगली आहे, पण यामुळे भ्रष्टाचार थांबतो का? हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

ऐन हंगामात परिणाम
भूषण खडके (सदस्य, पाइप मॅन्युफॅक्‍चरिंग असो.) - पाइप उद्योग शेतीशी निगडित आहे. पण शेतकऱ्यांजवळच ‘कॅश’ नसल्याने त्यांच्याकडून माल खरेदी केला जात नाही. विदर्भ, मराठवाडा येथून होणारी मागणीही थांबल्याने उद्योग थंडावला आहे. शेतकरी या दिवसांत पिकांना पाणी भरत असल्याने पाईपला मागणी असते. परंतु ऐन हंगामात नोटा बंदी झाल्याने त्याचा मोठा फटका बसला आहे.

Web Title: Farmers ended pipe industry to customer