शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण; 24 वर्ष जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

- आराई (ता.बागलाण) येथील गोरल्या नाला पाझर तलावासाठी गेल्या २४ वर्षांपूर्वी शासनाने शेतकर्‍यांकडून घेतलेल्या जमिनींचा मोबदला अद्यापही त्यांना मिळाला नाही.

-  गेल्या चार दिवसांपासून येथील तहसिलदार कार्यालयासमोर शेतकर्‍यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

सटाणा : आराई (ता.बागलाण) येथील गोरल्या नाला पाझर तलावासाठी गेल्या २४ वर्षांपूर्वी शासनाने शेतकर्‍यांकडून घेतलेल्या जमिनींचा मोबदला अद्यापही त्यांना मिळाला नाही. गेल्या चार दिवसांपासून येथील तहसिलदार कार्यालयासमोर शेतकर्‍यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र पाच दिवस उलटूनही संबंधित खात्याच्या एकाही अधिकार्‍याने अथवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे उपोषणकर्त्या शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, आराई ग्रामस्थांनी या बेमुदत उपोषणास पाठिंबा म्हणून आता तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.  

आराई येथे जलसंपदा विभागाने गोरल्या नाला पाझर तलावासाठी सन १९९५ - ९६ मध्ये तीस शेतकर्‍यांकडून १७ एकर जमीनीचे भूसंपादन केले होते. सन २००० मध्ये पाझर तलावाचे काम पूर्ण झाले. मात्र जुलै २०११ मध्ये झालेल्या जाहीर निवाड्यात जमिनींचा प्रत्यक्ष ताबा २००० मध्ये घेतल्याचे दर्शविले आहे. जाहीर निवाड्यात जमिनींचा प्रत्यक्ष ताबा घेण्यास पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी दाखविला आहे. बागलाण पंचायत समितीने भूसंपादन केलेल्या जमीनींचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यास हलगर्जीपणा केल्याने आम्ही सर्व शेतकरी अद्यापही मोबदल्यापासून वंचित आहोत. त्यामुळे आम्ही नवीन भूसंपादन कायदा २०१३, नियम २०१४ अन्वये नव्या दराने मोबदला मिळण्यास पात्र आहोत. आधीच दुष्काळामुळे हैराण असलेले आम्ही सर्व शेतकरी आता भूमीहीन झाले आहोत. मोबदला मिळत नसल्याने नाईलाजास्तव बेमुदत उपोषणाला बसावे लागत असल्याचे शेतकर्‍यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन आणि तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेतली. त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे जोपर्यंत जमिनींचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. 

बेमुदत उपोषणात अरुण सोनवणे, नरेंद्र जाधव, सुमनबाई अहिरे, रंजना सोनवणे, नरेंद्र जाधव, केशव सोनवणे, काकाजी देवरे, सुरेश देवरे, रंजना देवरे, आदींसह शेतकरी सहभागी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers on fast as deprived of land compensation for 24 years