खरिपाच्या पेरणीसाठी लक्ष्मीचं सौभाग्याचं लेणंच बँकाच्या हवाली!

bank
bank

येवला : काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याने सातबारा कोरा झाला खरा पण जिल्हा बँकेची झालेली आर्थिक कोंडी अन यामुळे रखडलेले खरीप पिक कर्जाचे वाटप यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर पुन्हा एकदा बँकाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. खरीपासाठी भांडवल उभे करण्यासाठी पावसाळा सुरु होताच घरातील सोन्याचे किडूक-मिडूक दागिने खाजगी सहकारी बँका व पतसंस्थात गहाण (तारण) ठेऊन शेतकरी भांडवल तयार करत आहेत. मागील काही दिवसांत जिल्ह्यातील सुमारे २५ हजार शेतकऱ्यांनी ६०० ते ८०० किलो सोने केवळ खरीपासाठी बँकांच्या हवाली केल्याचे चित्र आहे.  

शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करणारी आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत सापडल्याने खरिपाच्या कर्ज वाटपाला पैसा नाही तर राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना उभ्या करत नसल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी हक्काचा आधार नसल्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे.कर्जमाफीच्या गोंधळात जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाली असल्यामुळे याचा परिणाम पिक कर्जवाटपावर झाला आहे.सलग दुसऱ्या वर्षी हे चित्र असल्याने अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरु केली आहे.मात्र,जिल्हा बँकेकडून पीककर्ज मिळण्याची शक्यता धूसर आहे.तर राष्ट्रीयकृत बँका बोटावर मोजण्या इतपत शेतकऱ्यांना अन तेही तोंडे पाहून कर्ज वाटप करतात.त्यातच हंगाम उभा करायचा तर म्हणजे लाखो रुपयांचे भांडवल शेतीला लागते.त्यासाठी पैसे कसे उपलब्ध करावेत या विवंचनेतील शेतकरी आता घरातील लक्ष्मीचे सोने तरणासाठी बँकाकडे ठेऊ लागले आहेत.

डिसेंबरमध्ये सोडवले..मे मध्ये पुन्हा ठेवले..
मे पासूनच शेतकरी खरिपाच्या तयारीला लागतो.त्यामुळे मागील महिन्यापासून बँका व पतसंस्थात सोने तारणासाठी गर्दी वाढू लागली आहे.इतर कर्जापेक्षा या कर्जाचे व्याजदर कमी असल्याने शेतकरी घरात असलेले तसेच लक्ष्मीच्या अंगावरील दाग जड अंतकरणाने बँकांच्या हवाली करत आहेत.मागील वर्षी लाल व उन्हाळ कांद्याचे मनाचे समाधान होईल इतके विक्रमी उत्पन्न मिळाल्याने अनेकांनी त्यातून बँकात ठेवलेले कर्ज सोनेतारण भरले,इतर कर्ज परतावा करत नवीन खरेदी केली.खरीपाला पिक कर्ज मिळण्याचा अनेकांचा अंदाज होता.मात्र तोही फोल झाला असल्याने आता नव्या हंगामासाठी पुन्हा हेच सोने बँकेत ठेवण्याची नामुष्की ओढवली असल्याचे सांगितले जात आहे.     

जिल्हा बँकेची तयारी फक्त ५०० कोटींची...
शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुमारे अडीच हजार सभासद आहेत.त्यांना खरिपासाठी सरासरी १२०० ते १७०० कोटीचे कर्जवाटप केले जात असल्याचा इतिहास आहे.बॅकेने मागीलवर्षी १५०० कोटीच्या पीककर्जाचे उदिष्ट्य ठरविले होते. ते यंदा केवळ ५०० कोटीपर्यत असून जे मागील वर्षाचे थकबाकीदार नाही अश्याच शेतकऱ्यांना हे कर्ज वाटप केले जात आहेत.नेहमीच्या तुलनेत जिल्हा बॅकेचे १ हजार कोटीचे उदिष्ट्य घटल्याने गावातील सोसायट्यां आणि पर्यायाने पीक कर्जावर शेती फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहे.जिल्हा बँकेने पिक कर्जासाठी नाबार्डकडे एक हजार ५०० कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे. पण तोही धूळ खात पडून असल्याने कर्ज मिळण्याच्या आशा बासनात बसल्या आहेत.

सोनेतारणाचे कोटीच्या कोटी उड्डाणे...
जिल्ह्यातील शेतकरी सभासद - २ लाख ५० हजार
यातून सोनेतारण घेतलेले शेतकरी - सुमारे २५ ते ३० हजार (१०-१२ टक्के)
प्रत्येकी सरासरी ३ ते ५ तोळे प्रमाणे तारण सोने - ६०० ते ८०० किलो
एक तोळे सोण्याला सरासरी मिळणारे पैसे - १६ ते २१ हजार 
दिवसाला एका बँकेत होणारे सोने तारण - २५ ते ३० तोळे

“शेतीचा हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांची कर्ज काढून पैसे उपलब्ध करण्यासाठी धावपळ सुरु आहे.मी येथील स्टेट बँकेच्या पनलवर असून दिवसभरात २५ ते ३० तोळे सोन्याचे मुल्यांकन करून देतो.सध्या येथील स्टेट बँकेत दिवसाला सोने तारणातून पाच लाखापर्यत कर्ज वाटप सुरु आहे.”
- सागर उदावंत,चैतन्य ज्वेलर्स,येवला 

"उन्हाळ कांद्याला भाव नसल्याने शेतकरी चाळीत कांदा साठवत आहेत.दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले आहे तर विहिरींना पाणी नसल्याने नगदी पिक शेतकऱ्यांना घेता येत नसल्यामुळे भांडवलाचा प्रश्न आहे.यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या लक्ष्मीचे सौभाग्यच लेनं बँकात तारण ठेवून खरीप हंगामासाठी बी बियाणे खरेदी करतांना दिसत आहे.आमच्याकडे दिवसाला एक ते दीड लाखांच्या आसपास सोने तारण व्यवहार होत आहेत."
- मकरंद सोनवणे,संचालक,अंदरसूल अर्बन बँक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com