महामार्गावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ छ्त्रपती शिवाजी माहाराजांच्या पुतळ्याजवळ विंचूर- प्रकाश राज्य महामार्गावर दोन ट्रॅक्टर ट्रॉली कांदा फेकून तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडले.

सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ छ्त्रपती शिवाजी माहाराजांच्या पुतळ्याजवळ विंचूर- प्रकाश राज्य महामार्गावर दोन ट्रॅक्टर ट्रॉली कांदा फेकून तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी व गटनेते काकाजी सोनवणे यांनी देखील सहभाग घेत भाजप विरोधी घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
onion 1
तीनही हंगामात बागलाण तालुका कांदा उत्पादन घेण्यात जिल्ह्यात आघाडीवर आहे. तालुक्‍यात दुष्काळी पार्श्‍वभूमीवरही नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. मात्र समाधानकारक भाव नसल्याने चाळीत साठवलेल्या उन्हाळी कांद्याचे प्रमाण भरपूर आहे. साहजिकच बाजारात नवीन व जुना अशा दोन्ही प्रकारचा कांदा येत असून दरातील घसरगुंडी मात्र कायम आहे. सद्यस्थितीत कांद्याला अतिशय निचांकी भाव मिळत असून उत्पादन खर्चासह वाहतूक खर्चही निघत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे.

आज बुधवारी सकाळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरू होताच बाजारभावात अधिकच घसरगुंडी  झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला असतानाच कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. याच नवीन कांद्याला काल मंगळवारी (ता.११)  साडेचारशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळालेला असताना दुसऱ्या दिवशी अवघा दीडशे रुपये प्रतिक्विंटल भाव पुकारल्याने दोन्ही शेतकरी संतप्त झाले. त्यांनी कांद्याचे ट्रॅक्टर बाजार समिती बाहेर आणून राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सर्व कांदा रस्त्यावर ओतून दिला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग तसेच मालेगाव रस्त्यावर सर्वत्र कांदा पसरल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलनात सहभागी घेत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, पालिकेचे गटनेते काकाजी सोनवणे आणि पदाधिकार्‍यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर ठिय्या देत शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या भाजपा शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
Image may contain: 1 person, crowd, tree, sky and outdoor
यावेळी माजी आमदार संजय चव्हाण म्हणाले,''नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत शेतमालाला दीडपट हमी भाव देण्याची घोषणा केली होती. मात्र साडेचार वर्ष उलटल्यानंतर आज सरकारला आश्वासनांचा विसर पडला असून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे. चार राज्यातील भाजपचा पराभव हा शेतकऱ्यांचा विजय असून येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला घरचा रस्ता दाखविल्या शिवाय शेतकरी गप्प बसणार नाहीत. ''
onion 4
दरम्यान, आंदोलनामुळे विंचूर-प्रकाशा राज्य महामार्ग व मालेगाव रस्त्यावरील वाहतूक दोन तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे तात्काळ आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.  अखेर दोन तासानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, पालिका गटनेते नितीन सोनवणे, ज. ल. पाटील, जिभाऊ सोनवणे, दिपक रौंदळ, अशोक निकम, संजय पवार, अमोल बच्छाव, रत्नाकर सोनवणे, किरण पाटील, शेतकरी धिरज रौंदळ, रविंद्र बिरारी, काकाजी देवरे, विलास माळी,राजेंद्र मोरकर, प्रभाकर जाधव, केशव हिरे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

दुष्काळात मोठ्या कष्टाने कांदा पिकविला. आज बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या तीस क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल अवघा १५० रुपयेच भाव मिळाला. या तीस क्विंटल कांद्यासाठी वाहतुकीसह आम्हाला २४ ते ३० हजार रुपये खर्च आला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजार भाव मिळत नसल्याने संतापून रस्त्यावर हा कांदा फेकावा लागला. 
- रवींद्र बिरारी, कांदा उत्पादक शेतकरी, कंधाणे 

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार काहीतरी करेल या आशेने सन २०१४ मध्ये भाजपाला मतदान केले होते. मात्र गेल्या साडे चार वर्षात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. कर्ज काढून शेती करत असून आता कर्ज भरण्यासाठी पैसे नाही. त्यामुळे आत्महत्या करण्यापलीकडे आमच्याकडे काहीच उरले नाही.  
- प्रशांत चव्हाण, कांदा उत्पादक शेतकरी धांद्री                     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmers protest against the government by Pour out Onion on the highway