बाळ दगावल्याने पित्याने घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात पत्नीचे सीझर होऊन जन्मलेले बाळ दगावले आणि पत्नी अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत असल्याने उद्विग्न तरुणाने जिल्हा रुग्णालयात झाडाला लटकून घेत आत्महत्या केली. दिवस उजाडल्यावर सकाळी अतिदक्षता विभागाजवळील गुलमोहरच्या झाडावर मृतदेह लटकताना दिसल्यावर एकच गोंधळ उडाला. 

जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात पत्नीचे सीझर होऊन जन्मलेले बाळ दगावले आणि पत्नी अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत असल्याने उद्विग्न तरुणाने जिल्हा रुग्णालयात झाडाला लटकून घेत आत्महत्या केली. दिवस उजाडल्यावर सकाळी अतिदक्षता विभागाजवळील गुलमोहरच्या झाडावर मृतदेह लटकताना दिसल्यावर एकच गोंधळ उडाला. 

चोपडा तालुक्‍यातील उनपदेव रामजीतांडा येथील आदिवासी तरुण देवला बारकू पावरा (वय 26) याची पत्नी उबऱ्याबाई (वय 20) गर्भवती असल्याने तिला प्रसूतीसाठी तीन दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी (ता.30) गुंतागुंतीची प्रसूती असल्याने डॉक्‍टरांनी सिझेरीयनने प्रसूतीचा निर्णय घेतला. बाळ जन्मताच मृत्युमुखी पडले तर पत्नी उबऱ्याबाई गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देत असून, अतिदक्षता विभागात दाखल आहे. मुलाच्या मृत्यूने दु:खी असलेल्या देवला याने मध्यरात्रीनंतर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाजवळील झाडावर गळ्यातील उपण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.

सकाळी सातच्या सुमारास रुग्णांच्या नातेवाइकांची ये-जा वाढल्यावर लक्ष गेल्याने एकच खळबळ उडाली. रुग्णालयातील डॉक्‍टर, कर्मचारी आणि उपचारासाठी आलेल्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गळफास घेणारा कोण, याचा शोध सुरू असताना देवलाची आई पोचली व तिने एकच हंबरडा फोडत आक्रोश केला. पोलिसांना घटना कळविल्यावर सहाय्यक निरीक्षक संदीप अराक घटनास्थळावर दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला. 

डोळे उघडताच मुलाचा मृतदेह 
जिल्हा रुग्णालय आवारात अज्ञात तरुणाने गळफास घेतल्याने गर्दी झालेली होती. रुग्णालयीन कर्मचारी इतर रुग्णांच्या नातेवाइकांनी गर्दी केल्यावर कोण-कोण? असे गर्दीतून विचारणा होताना झाडावर लटकलेला मृतदेह मुलाचाच असल्याचे बघताच देवलाच्या आईने एकच हंबरडा फोडला. कालच नातवाचा जन्मतःच मृत्यू झाला. देवलाची पत्नी मृत्यूशी झुंज देतेय.. दिवस उजाडला डोळे उघडताच मुलाचा मृतदेह दिसल्याने देवलाच्या आईने आक्रोश केला. 

अडीच तास मृतदेह लटकून 
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागासमोरील आवारात गुलमोहरच्या झाडाला तरुणाने गळफास घेतल्याची घटना उघडकीस येताच रुग्णालय परिसरात एकच गर्दी झाली. रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी जिल्हापेठ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती कळविली. बराच वेळ निघून गेल्यावर पोलिस येत नाही म्हटल्यावर कर्मचाऱ्यांनी डॉ. किरण पाटील यांना घटनेची माहिती सांगितल्यावर त्यांनी स्वतः 7 वाजता फोन लावल्यावर साडेआठच्या सुमारास पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचे रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: father commit suicide after baby s death