मुलीच झाल्या पित्याला खांदेकरी

प्रमोद सावंत
रविवार, 6 जानेवारी 2019

मालेगाव - देशात अवघ्या दहा राज्यांत सीमित असलेल्या व सर्वाधिक अशिक्षित मांग-गारुडी समाजातील पाच मुलींचे पिता असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निवृत्त उपअधीक्षक केशव ताडू लोंढे (वय ६७) यांच्या पार्थिवाला चार मुलींनी खांदा दिला. सर्वांत लहान्या सरिताने अग्निडाग दिला. जातपंचायतीचा विळखा भटक्‍या, विमुक्त व मागास जातीत घट्ट होत असताना या प्रकारातून मुलींनी व येथील मांग-गारुडी समाजबांधवांनी सर्वच समाजाला वंशाला दिवाच नव्हे, तर पणतीही खांदा देऊ शकते, असा आदर्श संदेश दिला आहे.

मालेगाव शहरातील टिळकनगर भागात लोंढे परिवार वास्तव्याला आहे. केशव लोंढे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी सेवा केली. मात्र, त्यांचे कुटुंबीय मालेगावी होते. लोंढे यांना भारती सकट (सोलापूर), भाग्यश्री पाथरकर (मनमाड), रोहिणी पाथरकर (पुणे), सपना व सरिता पाथरे (दोघी मालेगाव) अशा पाच मुलीच होत्या. लोंढे यांनी मुलींना उच्चशिक्षित केले. एक मुलगी प्राध्यापक, तर एक नोकरीस आहे. अन्य तिघी संसारात रमल्या आहेत. लोंढे यांना मधुमेहाचा त्रास होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. माझ्या पार्थिवाला मुलींनीच खांदा द्यावा, असे ते वारंवार बोलून दाखवत. त्यांचे नुकतेच निधन झाले. शहरातील समाजबांधव जमा झाले. पार्थिवाला खांदा कोण देणार, याची चर्चा सुरू झाली. तोच मुलींनी बाहेर येत त्यांच्या वडिलांची इच्छा बोलून दाखविली. त्याला टिळकनगर भागातील रहिवाशांसह सर्व समाजबांधवांनी संमती दर्शविली आणि भारती, भाग्यश्री, रोहिणी, सपना या चौघी खांदेकरी झाल्या. 

येथील श्रीरामनगर स्मशानभूमीत सरिता पाथरेने पित्याला अग्निडाग व पाणी दिले. सरिताने स्मशानभूमीतच अंगावर पाणी घेत मुलाचे सर्व सोपस्कार पार पाडले. पाचही मुलींनी पित्याची इच्छा पूर्ण करीत वंशाला दिवाच हवा, हा भ्रम खोटा ठरविला. मांग-गारुडी समाजाचीही जातपंचायत आहे. प्रत्येक आडनावाचा एक पंच जातपंचायतीत असतो. मांग-गारुडी समाज प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर मागासलेला व अशिक्षित आहे. येथील समाजबांधवांनीही यातून चांगला संदेश दिला.

देशातील मांग-गारुडी समाजाची लोकसंख्या ७५ हजार
समाज वास्तव्याला असलेली राज्ये १०
मांग-गारुडी समाजाचे वास्तव्य असलेले जिल्हे १९०
सर्वाधिक लोकसंख्या असलेली राज्ये  महाराष्ट्र ३३ हजार, मध्य प्रदेश ३१ हजार

Web Title: Father Daughter Funeral