PHOTO : बाप हा बापच असतो! 'या' जन्मदात्याने मुलाला दिला पुन्हा दुसरा जन्म..

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

शिर्डीतील आदिराज शशिराज कुऱ्हाडे (वय 9) यकृताच्या गंभीर आजारामुळे मृत्यूशी झुंज देत होता. आई-वडील दोघे मजुरी करत असल्यामुळे ते आदिराजच्या आजारावर उपचारही करू शकत नव्हते. मदतीलाही कुणी नसल्याने उपचार थांबले होते. मदतीसाठी कुऱ्हाडे कुटुंबीयांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असला तरी त्यात यश येत नव्हते.

नाशिक : यकृताच्या गंभीर आजारामुळे प्रत्येक क्षणी मृत्यूशी झुंजणाऱ्या शिर्डीतील नऊवर्षीय आदिराज कुऱ्हाडे याच्या आयुष्याची नवी इनिंग वडिलांनी दान केलेल्या यकृतामुळे सुरू झाली आहे. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने उपचारासाठी कुऱ्हाडे यांच्याकडे पैसाही नव्हता. परंतु डॉ. विक्रम राऊत यांनी मोफत प्रत्यारोपण करत एकही नया पैसा घेतला नाही. चिमुकल्या आदिराजच्या चेहऱ्यावरच नव्हे, तर वडील शशिराज यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलविले. डॉक्‍टरांची सामाजिक जाणीव या प्रसंगातून अधोरेखित झाली आहे. 

पित्याच्या यकृताने चिमुरड्या आदिराजाला वरदान
शिर्डीतील आदिराज शशिराज कुऱ्हाडे (वय 9) यकृताच्या गंभीर आजारामुळे मृत्यूशी झुंज देत होता. आई-वडील दोघे मजुरी करत असल्यामुळे ते आदिराजच्या आजारावर उपचारही करू शकत नव्हते. मदतीलाही कुणी नसल्याने उपचार थांबले होते. मदतीसाठी कुऱ्हाडे कुटुंबीयांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असला तरी त्यात यश येत नव्हते. आदिराज व त्याच्या कुटुंबाचा संघर्ष सुरूच होता. त्यातच खेडले झुंगे येथील शंकर शिंदे, अभिषेक घोटेकर यांची भेट घेत कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची कहाणी सांगितली. शिंदे यांनी दिल्लीतील सहकारी निरंजन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे डॉ. विक्रम राऊत यांच्याशी संपर्क साधून कुलकर्णी यांनी उपचारासाठी साकडे घातले. डॉ. विक्रम राऊत यांनी आदिराजचे मोफत प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्याचे वडील शशिराज यांचे यकृत प्रत्यारोपण पार पडले. या वेळी डॉ. विक्रम राऊत, डॉ. अभिजित बागडे, डॉ. केजुल शाहा, डॉ. राहुल वर्मा, डॉ. अशोक थोरात, डॉ. अमृत राज, डॉ. अर्मिन जास, डॉ. ललीत वर्मा, डॉ. विष्णू बिरादर, डॉ हर्षद यांच्या टीमने शस्त्रक्रिया यशस्वी केली. 

Image may contain: one or more people

PHOTO : मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमधिल शस्ञक्रिया यशस्वी पार पाडणारे डॉक्‍टर्स व चिमुकला आदिराज सह वडील शशीराज कुऱ्हाडे

डॉ. राऊतांकडून मोफत प्रत्यारोपण, गरीब कुटुंबाला मदतीचा हात 
डॉ. राऊत म्हणाले, की यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेदरम्यान खराब झालेले यकृत काढले जाते. त्यास जिवंत किंवा मृत देणगीदाराकडून निरोगी यकृत बदलले जाते. यकृत प्रत्यारोपण सामान्यतः अशा लोकांसाठी असते, ज्यात गंभीर यकृत आजारामुळे मोठी गुंतागूंत झालेली असते. हे यकृत जिवंतदाता प्रत्यारोपण होते. म्हणजेच देणगी देण्यास इच्छुक असलेला जवळचा नातलग असावा. दाता आणि प्राप्तकर्त्याची शस्त्रक्रिया एकाचवेळी केली जाते. प्रत्यारोपणानंतर प्रत्यारोपीत लोब त्वरित पुन्हा निर्माण होईल. दाता आणि प्राप्तकर्त्यांमध्ये पुन्हा नवीन लोब सहसा दोन आठवड्यांच्या आत मूळ यकृत आकाराच्या 85 टक्‍क्‍यांपर्यंत वाढतो. 

मुलाचे प्राण वाचविण्यासाठी साकडे
आदिराजच्या यकृतात बिघाड असल्याचे समजल्याने मुंबईचे डॉ. विक्रम राऊत यांना विनंती करून मुलाचे प्राण वाचविण्यासाठी साकडे घातले. डॉ. राऊत यांनी दाखविलेल्या उदात्त भावनेमुळे चिमुकल्याचे प्राण वाचले.- निरंजन कुलकर्णी, अभियंता, दिल्ली 
 
आदिराजची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याची शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याचे वडील यकृतदाता असल्यामुळे लवकरात लवकर शस्त्रक्रियेची जबाबदारी डॉ. राऊत यांनी स्वीकारली. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आदिराजला जीवदान मिळाले आहे. - शंकर शिंदे, वकील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father's liver save son at Nashik Marathi News

टॅग्स
टॉपिकस