गुणवंतांचा कौतुक सोहळा शनिवारी नाशिकमध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

ग्रामीण आणि आदिवासी भागामधील गुणवत्ता विकासाला "अधिकारी व्हायचंय मला...' या उपक्रमाने हातभार लागला आहे. उपक्रमात सातत्य राखण्यासाठी यापुढेही जिल्हा परिषदेचे सहकार्य राहील.
- विजयश्री चुंभळे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

नाशिक ः शहरीबरोबरच ग्रामीण अन्‌ आदिवासी भागातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेचा आत्मविश्‍वास वृद्धिंगत करण्यात यश मिळवलेल्या "अधिकारी व्हायचंय मला...' या उपक्रमातील गुणवंतांचा कौतुक सोहळा शनिवारी (ता. 3 डिसेंबर) दुपारी दोनला होईल. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रस्त्यावरील सीएमसीएस महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

"सकाळ' आणि नाशिक जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला "मविप्र' आणि स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे सहकार्य लाभले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, शिक्षण सभापती किरण थोरे, "मविप्र'च्या सरचिटणीस नीलिमा पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा म्हणून हा उपक्रम शंभर दिवस राबविण्यात आला होता. स्पर्धा परीक्षांवर आधारित रोज एक प्रश्‍नावली "सकाळ'मधून प्रकाशित करण्यात आली होती. दहा प्रश्‍नांची उत्तरे देत असतानाच एका "मास्टर' प्रश्‍नाचे उत्तर विद्यार्थ्यांना माहिती व ज्ञानाच्या आधारे लिहावे लागले. त्यानंतर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या 241 विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, करंडक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

"सकाळ'च्या या उपक्रमाला जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा जयश्री पवार यांच्यासह तत्कालीन पदाधिकारी आणि सर्वच सदस्यांनी प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. हा उपक्रम पुढे जाण्यासाठी आताच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणेच गटनेत्यांचे सहकार्य लाभले.

गौरविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची तालुकानिहाय संख्या अशी ः
तालुक्‍याचे नाव गट "अ' गट "ब'

चांदवड 7 6
पेठ 6 7
इगतपुरी 7 9
सिन्नर 7 8
नाशिक शहर 6 6
नाशिक ग्रामीण 8 7
नांदगाव 8 6
दिंडोरी 8 7
सुरगाणा 10 6
येवला 9 7
कळवण 6 7
बागलाण 6 8
त्र्यंबकेश्‍वर 8 7
निफाड 6 6
मालेगाव ग्रामीण 8 6
मालेगाव शहर 6 6
देवळा 9 7

ग्रामीण आणि आदिवासी भागामधील गुणवत्ता विकासाला "अधिकारी व्हायचंय मला...' या उपक्रमाने हातभार लागला आहे. उपक्रमात सातत्य राखण्यासाठी यापुढेही जिल्हा परिषदेचे सहकार्य राहील.
- विजयश्री चुंभळे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

स्पर्धा परीक्षांची तयारी ही शालेय वयातच व्हायला हवी. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची विचारप्रक्रिया विकसित होते. पुढे जाऊन असे विद्यार्थी निश्‍चित अधिकारी होऊ शकतात. म्हणूनच "अधिकारी व्हायचंय मला...' हा उपक्रम कौतुकास्पद राहिला आहे. अशा प्रकारचे उपक्रम राबविणे, ही काळाजी गरज आहे.
- नीलिमा पवार, सरचिटणीस, "मविप्र'

स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये ऊर्मी वाढण्यास मदत झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये निश्‍चितपणे आत्मविश्‍वास वाढला आहे. या उपक्रमाचे कौतुक राज्यभर झाले आहे. विद्यार्थ्यांमधील उत्साह लक्षात घेऊन यापुढील काळात स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- नवनाथ औताडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

Web Title: felicitation in nashik