तिची नाळही तशीच होती...अन् जन्मदातीनेच तिला फेकून दिले!

राजेंद्र बच्छाव
शुक्रवार, 8 मार्च 2019

जगभर महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा गौरव होत आहे. तर दुसरीकडे नाशिक येथील पांडवलेणीच्या पायथ्याशी आज दुपारी दोनच्या सुमारास अवघ्या तासाभरापूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक पिशवीत टाकून दिलेल्या अवस्थेत सापडले आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. 

इंदिरानगर (नाशिक) : जगभर महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा गौरव होत आहे. तर दुसरीकडे नाशिक येथील पांडवलेणीच्या पायथ्याशी आज दुपारी दोनच्या सुमारास अवघ्या तासाभरापूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक पिशवीत टाकून दिलेल्या अवस्थेत सापडले आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. 

या स्त्री जातीच्या अर्भकाची तब्येत ठणठणीत असून, जिल्हा रुग्णालयात तिला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आज दुपारी या ठिकाणी चहा व्यावसायिक सचिन घुगे यांना फाळके स्मारकाच्या कुंपणाच्या भिंतीवर पिशवीत टाकून दिलेले हे अर्भक सापडले. त्यांनी ते शेजारी व्यवसाय करणाऱ्या राजश्री शेजवळ, शीतल शिरसाठ यांना ते दाखवले. त्यांनी त्यातून ते बाहेर काढल्यानंतर ते स्त्री जातीचे असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अंकुश दांडगे आणि पोलिस शिपाई मोहिनी लांडगे यांनी रुग्णवाहिकेतून या अर्भकाला जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे पुढील उपचार करण्यात आले. या बाळाची नाळही तशीच होती. सर्वांगावर रक्ताचे डाग देखील होते. त्यामुळे अवघ्या तासाभरापूर्वीच हे जन्मलेले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात होता. 

दरम्यान, महिला दिनाच्या दिवशीच ही घटना समोर आल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी संताप व्यक्त केला आहे. 

एवढे गोंडस अर्भक पिशवीत टाकून देताना त्या मातेला कशाचेच काही वाटले नाही, याचे आश्चर्य वाटते. महिलाच महिलांची कशी शत्रू असते, हे यातून सिद्ध झाले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांइतक्याच प्रकारे वागणाऱ्या माता देखील दोषी धरल्या पाहिजेत. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधितांचा शोध घेऊन कठोर शिक्षा केली पाहिजे.

- राजश्री शेजवळ, प्रत्यक्षदर्शी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female Infant found on womens day